पुणे: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका अल्पवयीन धनिकपुत्राने रविवारी पहाटे अलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची (Pune Accident) घटना घडली होती. हा धनिकपुत्र पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. त्याने बाईकवरुन जात असलेल्या अनिश अवधिया (Anish Awadhiya) आणि अश्विनी कोस्टा (ashwini kosta) यांना चिरडले होते. यावेळी पोर्शे गाडी इतक्या वेगात होती की, अश्विनी कोस्टा हवेत उंच फेकली जाऊन जमिनीवर आपटली होती. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला होता. तर अनिस अवधिया याच्या बरगड्यांना जबर मार लागून त्याचाही मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त होत असताना पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबद्दल प्रचंड चीड व्यक्त केली जात आहे. ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कारचालक मुलगा आणि त्याच्या मित्रांना दुपारी दीडच्या सुमारास येरवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने मुलांसाठी बाहेरून पिझ्झा आणि बर्गर मागवला होता. एका झिरो पोलिसाने हे खाद्यपदार्थ मागच्या बाजूने पोलीस ठाण्यात नेले, असे वृत्त महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात प्रकाशित झाले आहे.
धनिकपुत्राला 15 तासांमध्ये जामीन
या अपघातानंतर स्थानिकांनी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला पोर्शे गाडीतून बाहेर काढून चोपले होते. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. मात्र, त्यानंतर हा धनिकपुत्र अवघ्या 15 तासांमध्ये जामिनावर बाहेर आला. न्यायालयाने या धनिकपुत्राला 15 दिवस वाहतूक पोलिसासोबत चौकात उभे राहून काम करण्याची, वाहतुकीचे बोर्ड रंगवण्याची आणि अपघात या विषयावर 300 शब्दांचा निबंध लिहण्याचे 'कठोर' निर्देश दिले. या धनिकपुत्राचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यासही सांगण्यात आले आहे.
काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक
या घटनेनंतर पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी याविरोधात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कुणाला पैशांची खूप मस्ती आली असेल तर ती जिरवायची ताकद आम्हा पुणेकरांमध्ये आहे, असे रवींद्र धंगेकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा
पुणे अपघात, दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर; पोलिसांनी सांगितलं कारण