NCP: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांच्या गाठीभेटी, दौरे, बैठका, मतदारसंघातील गाठी-भेटी आणि यात्रा यांना वेग आला आहे. अशातच काल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्यावतीने शिवस्वराज्य यात्रेला सुरूवात करण्यात आली आहे. अशातच काल या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) यांच्या पत्नीने हजेरी लावली होती. तर मागे लावलेल्या स्क्रीनवरती विलास लांडे (Vilas Lande) यांचा फोटो देखील लावण्यात आला होता, त्यामुळे पुन्हा एकदा विलास लांडे नेमके कोणत्या पक्षासोबत आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
अजित गव्हाणेंनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर लांडेंनी केली होती टीका
अजित पवारांच्या पक्षातील 4 पदाधिकाऱ्यांसह एकूण 24 जणांनी शरद पवारांच्या उपस्थितीत (Sharad Pawar) पक्षात प्रवेश केला. यामध्ये माजी आमदार विलास लांडेंचे निकटवर्तीय अजित गव्हाणेंचा देखील समावेश होता. माजी आमदार विलास लांडेंनी अजित गव्हाणेंवर पक्षांतरानंतर टीका केली होती, 'अजितदादांनी शहरातील माझ्यासह अनेकांना पद देऊन मोठं केलं. मात्र दादा तुमच्या पुढं पुढं करणारे मोठे होऊन, तुम्हाला सोडून जातात. याची मला खंत आहे. दादा आता तुम्ही कडक शब्दात त्यांना समज द्या. ज्याला थांबायचं त्याने थांबावं नसेल तर सोडून जावं, असं म्हणत अजित गव्हाणेंवर विलास लांडेनी (Vilas Lande) टीका केली आहे. दरम्यान विलास लांडेंच्या मार्गदर्शनाने मी शरद पवार गटात गेल्याचा दावा गव्हाणेंनी केला होता.
शिवस्वराज्य यात्रेच्या व्यासपीठावर विलास लांडे यांच्या पत्नीची हजेरी
काल (शुक्रवारी) भोसरीमध्ये पार पडलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या व्यासपीठावर विलास लांडे यांच्या पत्नी उपस्थित होत्या. व्यासपीठाच्या मागे लावलेल्या डिजिटल स्क्रिनवर विलास लांडे यांचा फोटो देखील पाहायला मिळाला. जुन्नरमधून शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात झाली. त्यावेळी अजित पवार गटाचे आमदार विलास लांडे (Vilas Lande) यांनी मंडपात जात तिथला आढावा घेतल्याने लांडेंची भूमिका काय आहे याबाबत चर्चा रंगली होती. संध्याकाळी झालेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या मेळाव्यात विलास लांडे यांच्या पत्नीने हजेरी लावली होती.
विलास लांडे यांच्याबाबत जयंत पाटलांची प्रतिक्रिया
विलास लांडे यांचा संपर्क झाला नाही. शिवस्वराज्य यात्रेच्या मेळाव्यात ते होते की नाही हे मला माहित नाही. मला कुणी भेटलेल नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.