पुणे : पुणे जिल्ह्यात सत्तांतराचे वारे जोरात वाहू लागले असून, अनेक मातब्बर नेत्यांनी भाजपकडे झुकता कल दाखवला आहे. त्यातच आता पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांचे नावही चर्चेत असून, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनीच त्यांच्यावर पक्षबदलासाठी दबाव वाढवला असून, या पार्श्वभूमीवर गावबैठकांचं आयोजन करून कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यास सुरुवात झाली आहे. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजय जगताप यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याच निवडणुकीत शरद पवारांचे समर्थक संभाजी झेंडे यांनी बंड करत अजित पवार गटाची उमेदवारी मिळवली, यामुळे पुरंदर मतदारसंघात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. संघपरिवाराचा पाठिंबा नसल्यामुळे आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर मतविभाजन झाल्याने जगताप यांना पराभव स्वीकारावा लागला.
माजी आमदार संजय जगताप भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा
काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सासवड आणि जेजुरी येथील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी संजय जगताप यांना भेटून भाजपमध्ये प्रवेश करण्याची मागणी केली आहे. संजय जगताप यांनी वारंवार या बातम्या नाकारल्या आहेत. कार्यकर्त्यांचा मोठा रेटा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आहे. परंतु अद्यापही संजय जगताप यांची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. संजय जगताप याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, संजय जगताप यांचे निकटवर्तीय आणि भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर पुरंदर-हवेली परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही सत्तेच्या जवळ जाण्याची चळवळ सुरू झाली आहे. "सत्तेशिवाय शहाणपण नाही," या भूमिकेतून अनेक कार्यकर्त्यांनी संजय जगताप यांना भाजपमध्ये जाण्याचा आग्रह धरला आहे. जगताप यांचे संघटनक्षमता, विविध सामाजिक संस्थांमधील प्रभाव, आणि तरुण कार्यकर्त्यांची फळी पाहता, भाजपसाठी ते फायदेशीर ठरू शकतात. भाजपच्या प्रदेश नेत्यांकडूनही त्यांच्या प्रवेशासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.
संजय जगताप यांचे आरएसएस कार्यकर्त्यांशी पूर्वीपासून चांगले संबंध आहेत. यामुळे त्यांच्या प्रवेशाला संघाचा विरोध असण्याची शक्यता कमी आहे. काही महिन्यांपूर्वी हे संबंध निवडणुकीच्या कारणाने तणावात आले असले, तरी आता नव्या समीकरणांतून ते पुन्हा सुसंगत होण्याची शक्यता आहे. आगामी काळात संजय जगताप कोणता निर्णय घेतात, याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पुरंदर मतदारसंघातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलू शकतात.