पुणे: पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलीस नाईक धनाजी भरत वणवे (वय 42) यांचे काल (बुधवारी, ता 10) सायंकाळी कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ही दुर्दैवी घटना कात्रज मंडई चौकात सायंकाळी सुमारे 6.45 वाजता घडली. त्यांच्या निधनामुळे पुणे पोलिस दलात शोककळा पसरली आहे. (Pune Traffic Police Naik suffers heart attack dies on duty At Katraj Mandai Chowk)
नेमकं काय घडलं?
पोलीस नाईक वणवे नेहमीप्रमाणे वाहतूक नियमनासाठी कात्रज मंडई चौकात तैनात होते. अचानक त्यांना चक्कर आली आणि ते कोसळले. तात्काळ उपस्थित सहकाऱ्यांनी त्यांना कात्रज येथील साईस्नेह रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार, हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळं पोलीस नाईक धनाजी भरत वणवे यांचा मृत्यू झाला.
एक कर्तव्यदक्ष आणि समर्पित अधिकारी
धनाजी वणवे हे गेली अनेक वर्षे पुणे शहर वाहतूक शाखेत कार्यरत होते. त्यांनी पोलिस सेवेत अत्यंत जबाबदारीने, प्रामाणिकपणे आणि शिस्तप्रियतेने आपले कर्तव्य बजावले. ट्रॅफिक नियंत्रणासारख्या कठीण कामात देखील त्यांचा नेहमी सकारात्मक आणि शांत दृष्टिकोन असायचा. त्यामुळे सहकारी पोलिसांमध्ये ते लोकप्रिय होते.
कोण होते धनाजी वणवे?
धनाजी वणवे गेली अनेक वर्षे पुणे शहर वाहतूक शाखेमध्ये कार्यरत होते. ते पोलीस नाईक म्हणून कर्तव्य बजावत होते. आपलं काम ते नेहमीच अत्यंत जबाबदारीने पार पाडायचे, शिस्तप्रिय आणि मनमिळावू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी ते कर्तव्यदक्षतेने नेहमी कार्य करत असायचे. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने संपूर्ण वाहतूक पोलीस विभाग सुन्न झाला आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
वणवे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुणे पोलीस दलाने त्यांच्या कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि अनेक सहकाऱ्यांनी वणवे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, त्यांना पोलीस दलातर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. कर्तव्य बजावत असताना प्राण गमावणारे धनाजी वणवे हे खऱ्या अर्थाने समर्पित आणि शौर्यवान पोलीस अधिकारी होते, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.