Sharad Pawar: नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाने समर्थन दिलेलं असताना शेकापचे नेते जंयत पाटील यांचा पराभव झाला. त्यांच्या परभवानंतर काँग्रेसची मते फुटल्याच्या आणि जंयत पाटील यांच्या पराभवाच्या अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, आज शरद पवारांनी (Sharad Pawar) यासंदर्भात भाष्य करताना, कोणी कोणाला फसवलं नाही. पण, रणनीतीबाबत मतभिन्नता होती, त्याचबरोबर आमची रणनीती चुकली असं म्हणतं मतांचं गणित सांगितलं आहे. आज ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
विधानपरिषदेचं गणित कुणामुळे चुकलं?
पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, शेकापचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याबाबत महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये निर्णय झालेला नव्हता. माझ्याकडे १२ मतं होती. शेकापच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा असं आम्हाला वाटत होतं. कारण, लोकसभा निवडणूक आम्ही डाव्या पक्षांसोबत लढवली होती. त्यांनी काही जागा मागितल्या होत्या, पण तेव्हा आम्ही त्या जागा देण्याच्या स्थितीत नव्हतो. त्यामुळे जयंत पाटलांना आम्ही पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं.
संधी आली तर डाव्यांना प्राधान्य द्यावं असं मला वाटत होतं. काँग्रेसची मतं जास्त होती. शिवसेना ठाकरे गटाकडे पुरेशी मतं नव्हती. पण, त्यांनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला. रणनीतीमध्ये मतभिन्नता होती. माझं व्यक्तिगत गणित वेगळं होतं. निवडून येण्यासाठी २३ मतं आवश्यक होती. माझं म्हणणं होतं, काँग्रेसने त्यांच्या उमेदवाराला मतं देऊन उरलेली मतं ५० टक्के ठाकरे गटाला द्या आणि ५० टक्के मतं जयंत पाटलांना द्या.
काँग्रेसकडे अधिकची मतं होती. आमच्याकडे बारा मतं होती. ठाकरे गटाकडे आमच्यापेक्षा जास्त मतं होती. काँग्रेसने पहिली मतं त्यांच्या उमेदवाराला देणं साहजिकच होतं. पण, उरलेली पहिली आणि दुसऱ्या पसंतीक्रमाची मतं योग्यपणे दिली असती तर तिन्ही उमेदवार निवडून आले असते. पण, आमची रणनीती चुकली, आणि जयंत पाटील पराभूत झाले असं शरद पवार म्हणाले आहेत.
पुढे बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, गरजेपेक्षा जास्त मतं असल्यामुळे ती टान्सफर होत होती. जास्तीच्या काँग्रेस आमदारांनी पहिलं मतं ठाकरेंना द्यावं आणि सेनेच्या आमदारांनी दुसरं मत शेकापला द्यावं, हे जर गणित जुळून आलं असतं तर तिन्ही उमेदवार निवडून आले असते. हे गणित सगळ्यांना मान्य झालं नाही. त्यामुळे जयंत पाटील जिंकू शकले नाहीत, असं ते म्हणाले.
मविआत नेतृत्वावरून संघर्ष नाही
जयंत पाटलांना (Jayant Patil) विधानपरिषदेत उमेदवारी दिली असताना उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला. त्यामुळे मविआमध्ये नेतृत्वावरून संघर्ष आहे का या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, असं अजिबात नाही. निवडणुकीत आमचा उमेदवार नव्हता, तर जयंत पाटलांना आमची मते देऊ असे सांगितले होते. दुसऱ्या क्रमांकाच्या मतांवरून सुद्धा आम्ही चर्चा केली होती, असंही ते पुढे म्हणालेत.
संबधित बातम्या : Sharad Pawar: विरोधक 'त्या' बैठकीला का गेले नव्हते? शरद पवारांनी सांगितलं कारण, भुजबळांच्या भेटीवरही दिली प्रतिक्रिया