पुणे: राज्यात सध्या आरक्षणाचा (Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाच्या (Reservation) मुद्द्यावरती उपोषणाला बसला आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दोन दिवसांपुर्वी शरद पवारांची भेट घेतली. त्याआधी त्यांनी शरद पवारांवर विरोधक आरक्षणाच्या बैठकीला उपस्थित नव्हते त्यावरून हल्लाबोल केला होता.त्यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेत दीड तास ही या नेत्यामंध्ये बैठक चालली. या बैठकीनंतर छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली त्यांची माहिती दिली. मात्र, आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी या भेटीमध्ये काय चर्चा झाली त्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आरक्षणासंदर्भात बोलावलेल्या बैठकीला लिरोधक का नव्हते त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 


भेटीवर काय म्हणाले शरद पवार?


छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) घरी आले, ते मला भेटले, त्यांनी आरक्षणाच्या बाबतीत काही गोष्टी सांगितल्या. महाराष्ट्राचं हित हवं असेल तर तुम्ही या चर्चेमध्ये येण्याची गरज असल्याचं भुजबळांनी म्हटलं. मनोज जरांगे आणि मुख्यमंत्र्यामंध्ये का चर्चा झाली त्याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही. जरांगेचं उपोषण सुरू असताना काही मंत्र्याचं शिष्टमंडळ देखील गेलं होतं. त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं माहिती नाही. त्यामुळे त्यांच्यातील सुसंवाद आम्हाला माहिती नाही. त्यांची माहिती घेऊन बैठक घेऊ असंही त्यांनी यावेळी म्हटलं.


 


विरोधक बैठकीला का नव्हते उपस्थित?



आम्ही त्या मिटींगला न जाण्याचं एकच कारण होतं. दोघांशी सत्ताधारी पक्ष बोलत आहेत. दोघांसोबत चर्चा केल्यानंतर काही लोक मोठी-मोठी विधाने करत आहेत. पण प्रत्यक्षात त्यांच्यात काय चर्चा झाली, प्रस्ताव काय झाला त्याबाबत माहिती नाही. म्हणून आम्ही ठरवलं जोपर्यंत चर्चा काय झाली त्याचा प्रस्ताव काय झाला ते समोर येत नाही. तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यामुळे आम्हा बैठकीला गेलो नव्हतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. 


 


पवारांनी सांगितलं जयंत पाटलांच्या पराभवामागचं गणित


काँग्रेसकडे (Congress) अधिकची मतं होती. आमच्याकडे बारा मतं होती. ठाकरे गटाकडे आमच्यापेक्षा जास्त मतं होती. काँग्रेसने पहिली मतं त्यांच्या उमेदवाराला देणं साहजिक होतं. पण, उरलेली पहिली आणि दुसऱ्या पसंतीक्रमाची मतं योग्यपणे दिली असती तर तिन्ही उमेदवार निवडून आले असते. पण, आमची रणनीती चुकली. माझ्याकडे १२ मतं होती. शेकापच्या उमदवाराला पाठिंबा द्यावा असं आम्हाला वाटत होतं. कारण, लोकसभा आम्ही डाव्या पक्षांसोबत लढवली होती. त्यांनी काही जागा मागितल्या होत्या, पण ते आम्ही देण्याच्या स्थितीत नव्हतो. त्यामुळे जयंत पाटील यांना आम्ही पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं.


संधी आली तर डाव्यांना प्राधान्य द्यावं असं मला वाटत होतं. काँग्रेसची (Congress) मतं जास्त होती. ठाकरेंकडे पुरेसी मतं नव्हती. पण, त्यांनी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला. रणनीतीमध्ये मतभिन्नता होती. माझं व्यक्तिगत गणित वेगळं होतं. निवडून येण्यासाठी २३ मतं आवश्यक होती. काँग्रेसकडे (Congress) माझं म्हणणं होतं, तुमच्या उमेदवाराला मतं देऊन उरलेली मतं ५० टक्के ठाकरे गटाला द्या आणि ५० टक्के मतं जयंत पाटलांना द्या.


 


अजित पवार पक्षात परतले तर? 


पक्षफुटीनंतर अजित पवार आणि समर्थक आमदार खासदार पुन्हा पक्षात परतले तर त्यांना पक्षात घेणार का या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, घरात सगळ्यांना जागा आहे. पक्षात जागा आहे की नाही हा व्यतिगत निर्णय मी घेणार नाही. माझे सगळे सहकारी या संघर्षाच्या काळामध्ये मजबुतीनं उभे राहिले त्यांना पहिल्यांदा विचारल आणि ते तयार झाले तर मग काय असेल तो निर्णय घेईन


 


अजित पवारांनी बारामतीत विकास केला तरी लोकांनी तुम्हाला का निवडलं?


अरे ती बारामती आहे. लोकांशी वैयक्तीक संबंध ठेवले पाहिजे. याआधी मी फक्त शेवटची सभा घ्यायचो. मी ५० टक्के लोकांना नावाने ओळखायचो. पण आता जुनी लोकं नाहीत. मला खात्री होती की लोक सुप्रियाला निवडून देतील.