Jagadish Mulik : भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी (Jagdish Mulik) खासदार असे पोस्टर लावण्यात आले होते. पण हे सर्व बॅनर्स हटवून आता त्या जागी नवे पोस्टर लावण्यात आले आहेत. आतिक शेख  या तरुणाने जगदीश मुळीक यांना शुभेच्छा देणारे पोस्टर लावले होते. या पोस्टरवरुन विरोधकांनी जोरदार टीका केली होती. भाजपला चांगलंच सुनावलं होतं. त्यानंतर हे बॅनर्स खासदार गिरीश बापट यांच्या निधानापूर्वीच लावले होते. मात्र त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असं या तरुणानं म्हटलं  होतं. दरम्यान, आता आरोप-प्रत्यारोपानंतर मात्र हे पोस्टर्स हटवण्यात आले आहेत. 
 
‘भावी खासदार जगदीश मुळीक’ (Jagdish Mulik) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असं म्हणत, पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली होती. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन होऊन तीनच दिवस झाले असताना, पुण्यातील मुळीक यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली बॅनरबाजी चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे अनेकांनी टीका केली होती तर अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं बोललं जात होतं. मात्र मुळीकांना भावी खासदार म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावणाऱ्या तरुणाने एबीपी माझाशी बोलताना जाहीर माफी मागितली होती. 


हे पोस्टर पाहून राष्ट्रवादीने भाजपचा चांगलाच समाचार घेतल्याचं बघायला मिळालं होतं. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, विरोधीपक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या युवानेत्यांनी भाजपवर चांगलीच टीका केली. "हाच का तुमचा वेगळेपणा म्हणत त्यांनी भाजपवर ताशेरे ओढले होते. 10 दिवसांचे सुतक तर संपू द्या, मग लावा बॅनर, का तुम्ही वाटच बघत होतात… आणि म्हणता आम्ही इतर पक्षांपेक्षा वेगळे आहोत. हाच का तुमचा वेगळेपणा... बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजून वाहत आहेत. तोवरच तुम्ही बॅट पॅड घालून तयार", असंही आव्हाड यांनी ट्विटमध्ये लिहिलं होतं. तर "जरा माणुसकी राहू द्या एवढं गुडघ्याला बाशिंग बांधायचे काही कारण नाही. आपण 13 ते 14 दिवसांचा दुखवटा पाळतो. याचं तारतम्य सगळ्यांनी ठेवावं.", असं म्हणत अजित पवारांनी भाजपला चांगलंच खडसावलं होतं. 


मृत्यूपूर्वीच लावले होते पोस्टर्स


'खासदार गिरीश बापट यांच्या सल्ल्यानेच जगदीश मुळीक हे राजकारणात आले. त्यांनी आतापर्यंत बापटांच्या सल्ल्यानेच कामं केली. मात्र जगदीश मुळीक हे आमचे आवडते नेते आहे. याच वर्षी नाही तर दरवर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे आम्ही पोस्टर लावत असतो. त्याप्रमाणेच यावर्षीही हे पोस्टर लावले होते. यापूर्वी मंत्री म्हणून पोस्टर लावले होते आणि आता भावी खासदार म्हणून लावले होते. मात्र दुर्दैवाने खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं त्याच दिवशी हे पोस्टर हटवण्यात देखील आले. या सगळ्यावरुन विरोधक केवळ राजकारण करत आहेत. त्यांनी अशा प्रकारचं राजकारण विरोधकांनी करु नये, असं आतिक शेख यानं म्हटलं आहे.