बारामती, पुणे : राष्ट्रवादीतील फुटीनंतर राज्याचं लक्ष पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभेकडे लागलं आहे. बारामतील नणंद विरुद्ध भावजय अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar)  उमेदवारी मिळण्याची शक्यता असतानाच कार्यकर्त्यांनी मात्र सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित केली आहे. बारामतीतील अजित पवारांचे समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांनी थेट सोशल मीडियावर सुनेत्रा पवारांचे भावी खासदार स्टेट्स ठेवले आहेत. 


राज्याचं लक्ष असलेल्या बारामतीत यंदा पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. याचा पहिला अध्याय नमो रोजगार मेळाव्याच्या दिवशी राज्याला पाहायला मिळाला. बारामती काबिज करण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली आहे. त्यातच अजित पवार (Ajit Pawar)  बारामती लोकसभेंत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात मेळावे आणि सभा घेत आहे. याचा अर्थ अजित पवारांना काहीही झालं तरी यंदा बारामती काबिज करायची आहे. महायुतीकडून बारामतीत सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारही कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. रोज सुनेत्रा पवार प्रत्येक विधानसभा मतदार संघ पिंजून काढत आहे. ही सगळी तयारी सुरु असतानाच कार्यकर्त्यांनीदेखील सुनेत्रा पवारांची उमेदवारी सोशल मीडियावरुन जाहीर करुन टाकली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी आमचं ठरलं म्हणत सुनेत्रा पवारांचे भावी खासदार म्हणून स्टेटस ठेवलं आहे. 


स्टेट्स नाही तर बॅनरही!


काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले आहेत. बारामतीतील  आमराई परिसरात हे बॅनर्स लागले होते. आमराईतील सचिन काकडे या कार्यकर्त्याने सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार बॅनर लावले होते. 


 


बारामतीत नणंद-भावजयांचे दौरे वाढले !


मागील अनेक वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. शरद पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीचा नेतृत्व सुप्रिया सुळे आणि अजित पवारांकडे असल्याचे पाहायला मिळाले. मात्र राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर आता सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार असं चित्र निर्माण झालं आहे. त्यातच सुनेत्रा पवार राजकारणात मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह झाल्याचं दिसत आहे. त्यांचा विकासरथ तयार करण्यात आला आहे. त्या मार्फत विविध विकासकामांची ओळख त्या बारामतीकरांना करुन देताना दिसत आहे. अर्थात हे सगळं चित्र पाहून सुनेत्रा पवारच लोकसभेच्या उमेदवार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 


इतर महत्वाची बातमी-


Devendra Fadanvis On Pawar Family : बहिण, भाऊ, काका एकत्र आले, पण अबोला ठळक दिसला; फडणवीसांची अजितदादांवर हळूच मिश्कील टिप्पणी!