Pune Political News : खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागल्यास उमेदवारी कोणाला मिळणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. भाजपकडून पाच इच्छूक उमेदवारांच्या नावाची चर्चा आहे तर महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या दोन नावांची चर्चा आहे. यात आता नवा ट्विस्ट बघायला मिळत आहे. ही पोटनिवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडून आता राष्ट्रवादीदेखील इच्छुक असल्याचं दिसत आहे. पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याचा फोटो असलेलं बॅनर लावण्यात आलं आहे आणि याच नेत्याच्या कार्यकर्त्याकडून हे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल केलं जात आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा फोटो असलेलं बॅनर भावी खासदार म्हणून सध्या पुण्यात लावण्यात आले आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीदेखील इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. ही जागा काँग्रेसची असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्याचे भावी खासदार म्हणून बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. महाविकास आघाडीकडून जागा काँग्रेसकडे असल्याचा दावा केला जात आहे. मात्र आता राष्ट्रवादीही लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक झाली असल्याचे बॅनरबाजी वरून स्पष्ट होत आहे.
महाविकास आघाडीकडून या नावांची चर्चा!
महाविकास आघाडीकडून उमेदवाराची चाचपणी सुरु झाली आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध न होण्याची चिन्ह आहेत. त्यासाठी तीन नावांची चर्चा आहे. काँग्रेसचे अरविंद शिंदे, मोहन जोशी आणि रविंद्र धंगेकर या तीन नावांची चर्चा सुरु आहे. आतापर्यंतच्या निवडणुकींचा इतिहास पाहिला तर भाजपचा उमेदवार बघूनच महाविकास आघाडी किंवा विरोधात असलेला पक्ष उमेदवाराची घोषणा करतात. त्यामुळे ब्राह्मणांना उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीदेखील त्याच पट्टीच्या नेत्याला उमेदवारी देण्याची शक्यता आहे. मात्र जगताप यांच्या बॅनरमुळे नवा ट्विस्ट आला आहे.
भाजपची तयारी सुरू
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून पाच नावं चर्चेत आहेत. गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावं चर्चेत आहेत. या पाच जणांपैकी भाजप एकाला उमेदवार म्हणून संधी देणार मात्र या पाचही जणांनी पुण्याच्या विकासासाठी अनेक नवीन प्रोजक्ट्स हाती घेतले आहेत. पोटनिवडणूक जाहीर झाली तर बापटांच्या कुटुंबियांमधील सदस्याला उमेदवारी दिली जाऊ शकते. मुलगा गौरव बापट आणि सून स्वरदा बापट या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.