Pune Police Seize Gold:  राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून सर्वत्र नाकाबंदी आणि तपासण्या सुरू झाल्या आहेत. निवडणुकीमध्ये पैसे आणि गैरव्यवहार होऊ नये यासाठी मोठे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. अशातच आज पुण्यात सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटींचे सोने पकडले गेले आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. सातारा रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास नाकाबंदी पोलिसांनी कोट्यवधीचे सोने जप्त केले आहे. 


एका संशयित वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात हे सर्व सोन्याचे दागिने सापडले. हे सोनं नेमकं आलं कुठून, कुठे जात होतं? कोणाचं होतं याचा तपास आता पोलीस करत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे 138 कोटी रुपये किंमत असलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, डिलिव्हरी ट्रान्सपोर्टची असण्याची शक्यता आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी आज नाकाबंदी दरम्यान एक टेम्पो पकडला. 138 कोटी रुपये किमतीचे सोने या टेम्पो मध्ये आढळून आले आहे. सहकारनगर परिसरातून ताब्यात घेतलेला हा टेम्पो एका खाजगी लॉजिस्टिक कंपनीचा असून यामधील सोनं पुण्यातील कुठल्या व्यापाऱ्याकडे जात होतं याचा तपास सध्या सुरू असून पोलिसांनी या संदर्भात सर्व माहिती आयकर विभाग तसेच निवडणूक आयोगाला कळवलेली आहे. पुण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात हा टेम्पो नेण्यात आलेला आहे. 


ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यात अनेक ठिकाणी कोट्यावधी रूपये सापडत आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये गैरव्यवहार होऊ नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. शहर परिसरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. गाड्यांची तपासणी केली जात आहे, त्या तपासणीमध्ये हे सोने आढळून आले आहे.


पोलिसांनी दिली माहिती


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तपासणीवेळी हा टेम्पो अडवला. त्यामध्ये पांढऱ्या पोत्यात बॉक्स आढळले, त्यानंतर चालक आणि आणखी एक जण यामध्ये होता, त्यांच्याकडे चौकशी केली, त्याची तपासणी अद्याप चालू आहे. हे जवळपास १३८ कोटी रूपयांचं सोनं असल्याची माहिती समोर आली आहे. 


गाडीतून 5 कोटींची रोख रक्कम जप्त 


पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. या घटनेमुळे सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. सोमवारी रात्री पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली.