पुणे: अखेर पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झाला आहे. आज सकाळी(शुक्रवारी) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वडगाव शेरीचे विद्यमान आमदार यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे नेते आणि माजी आमदार जगदीश मुळीक देखील आग्रही होते, तर मुळीक यांना भाजप श्रेष्ठींनी शब्द दिल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं, त्यानंतर आज सकाळी सुनील टिंगरे यांच्या नावाची घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनील टिंगरे यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे.


महायुतीमधील सर्व नेते, माझ्या पक्षाचे नेते या सर्वांचे मी आभार मानतो. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती, त्यामुळे शंका नव्हती पण सगळ्यांना जागा हवी असतात. आता उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे महायुतीतील सर्वजण प्रचार करतील, आदेश आला की सर्वजण काम करतील. कल्याणी नगर अपघात प्रकरण सर्व क्लिअर झाले आहे. सगळे नेते येतील प्रचाराला येतील. 28 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहे. जगदीश मुळीक यांच्यासह सर्वांची भेट घेणार आहे. ते जेष्ठ नेते आहेत, असंही यावेळी टिंगरे म्हणालेत. 


दुसऱ्या यादीत कोणाला उमेदवारी


तासगाव कवठे-महाकाळ : संजय काका पाटील 
अणुशक्तीनगर : सना मलिक 
इस्लामपूर : निशिकांत पाटील 
लोहा कंधार : प्रतापराव चिखलीकर 
वांद्रे पूर्व : झिशान सिद्धकी  
वडगाव शेरी : सुनिल टिंगरे
शिरुर : ज्ञानेश्वर कटके


उमेदवारीसाठी सुरू होती चढाओढ


पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून आजी-माजी आमदार इच्छुक होते. अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना वगळून आपल्याला उमेदवारी मिळेल, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला तसे आश्वासन दिल्याचा दावा भाजपचे माजी आमदार जगदिश मुळीक यांच्याकडून करण्यात आला होता. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र, पक्षाकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नव्हती. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत सुनील टिंगरेंचे नाव देखील नव्हते. दुसरीकडे या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळेल असा दावा भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला. त्यामुळे या मतदारसंघात तिढा निर्माण झाल्याच्या चर्चा होत्या. आज सकाळीच सुनील टिंगरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  आता जगदीश मुळीक कोणती भूमिका घेतात, किंवा त्यांना दुसरीकडे कुठे उमेदवारी देण्यात येते का याबाबतच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.