पुणे : पुणे पोलीस दलातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केली. आज (5 एप्रिल) सकाळी ही घटना समोर आली आहे. भारत दत्ता आस्मर असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.  खडक पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिस चौकीच्यावर असलेल्या रेस्टरूममध्ये पोलिसांने स्वत:ला संपवलं आहे. रात्री ड्युटीवर असताना स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या का केली? याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. 


भारत दत्ता आस्मर हे खडक पोलीस ठाण्यात कामावर होते. ते रोज प्रमाणे ड्यूटीला गेले. पोलीस चौकीत कोणी नसल्याचं पाहून त्यांनी आराम खोलीत जावून त्यांनी रेस्टरुमची आतून कडी लावून घेतली. त्यानंतर त्यांनी कार्बाइनच्या साह्याने स्वत:वर चार गोळ्या झाडल्याची माहिती आहे. ते काही वर्षांपूर्वी पोलीस दलात दाखल झाले होते. साधारण सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. काही वेळात या भारत यांचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात येणार आहे. 


अचानक केलेल्या आत्महत्येमुळे आस्मर यांच्या कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. या पोलिसाने असं अचानक आयुष्य का संपवलं? कौटुंबिक वाद होते की वेगळं काही कारण होतं?,याची पोलिसांकडून सखोल चौकशी पोलीस करत आहेत.