Paper Leak :  शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळासमोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत काहींना अटक केली होती. त्यानंतर आता आरोग्य विभाग गट 'ड' परीक्षा पेपरफुटीच्या तपासाला आणखी वेग आला आहे. पुणे पोलिसांनी या पेपरफुटीसंदर्भात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. 


पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अर्जुन भरत राजपूत असे असून त्याला औरंगाबादमधून अटकत करण्यात आली. आरोपी अर्जुन राजपूत हा औरंगाबाद येथे म्हाडा परीक्षेसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अर्जुन राजपूत याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


पेपरफुटीच्या म्होरक्याला अटक 


आरोग्य भरती पेपर फुटीतील पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला आणखी एक म्होरक्या सायबर पोलीसांच्या हाती लागला. अतुल प्रभाकर राख असे गुरुवारी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अतुल राख हा याआधीच अटकेत असलेला आरोपी संजय सानप याचा मेहुणा आहे.  पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला मुख्य आरोपी जीवन सानप याची पेपरफुटी प्रकरणातील संबंधित सर्व कामे अतुल राख करायचा. अतुल राखला पोलिसांनी पुण्यातूनच अटक केली. आरोग्य भरतीतील गट ‘क’ आणि गट ‘ड’ या दोन्ही परीक्षांचे पेपर फुटले होते. या पेपरफुटीमुळे परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली होती. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत काही आरोपींना अटक केली असून काहींचा शोध सुरू आहे. आरोग्य भरतीच्या दोन्ही पेपरफुटीमध्ये पुणे सायबर पोलीसांना वडझरीचे सानप बंधू हवे आहेत. या प्रकरणात केवळ संजय शाहुराव सानप याला पोलिसांनी गजाआड केले आहे. 


अधिकाऱ्यांनाही अटक


राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले यांना अटक करण्यात आली होती. आरोग्य विभाग भरतीचा पेपर सेट करण्यात डॉ. महेश बोटले सहभागी होते. त्यांनीच हा पेपर फोडल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोग्य विभागातील भरती प्रकरणात आतापर्यंत बारापेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.


२४ ऑक्टोबर 2021 रोजी झालेला आरोग्य विभागाचा गट क चा पेपरही फुटला होता. यामध्ये न्यासा कंपनीचे अधिकारी सहभागी होते अशी माहिती पोलीस तपासात समोर आली होती.