पुणे : एसपी हॉटेलची बिर्याणी फुकटात खावीशी वाटणाऱ्या आणि त्यासाठी आपल्या कनिष्ठ सहकाऱ्याला फोनवरुन ऑर्डर सोडणाऱ्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. माध्यमांमध्ये वृत्त आल्यानंतर या क्लिपची दखल गृहमंत्रालयानेही देखील घेतली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, संबंधित महिला अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांकडे आपली भूमिकाही मांडली आहे. 


माझ्या विरोधात षडयंत्र : महिला अधिकारी
प्रियंका नारनवरे असे या महिला पोलीस उपायुक्तांचे नाव आहे. प्रियंका नारनवरे यांनी प्रसारमाध्यमांकडे दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, 'हा बदल्यांची चर्चा सुरु असतानाच्या काळातील प्रकार असावा. हितसंबंध बिघडल्याने कोणीतरी माझ्याविरुदध हे षडयंत्र रचले आहे. इथं असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांचे या भागात हितसंबंध आहेत. त्यामुळे माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या करीअरच्या वाटचालीत बाधा यावी. या क्लिपमधील वाक्ये मी बोलले नाही. तसेच, काही वाक्ये माझ्या आवाजात त्यात मॉर्फ करुन घुसडली आहेत', असा दावाही नारनवरे यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, जेणेकरुन सत्य समोर येईल, अश्याही नारनवरे म्हणाल्या.


काय आहे ऑडिओ क्लिप
जवळपास 5 मिनिटाची ही ऑडिओ क्लिप आहे. त्यात महिला अधिकारी मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज भाजीची ऑर्डर द्यायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहेत. त्यांना हे सगळं एका चांगल्या हॉटेलमधून हवं आहे. त्याचबरोबर त्याची चव चांगली असावी असाही त्यांचा हट्ट आहे. या महिला अधिकारी फक्त ऑर्डर देऊन थांबल्या नाहीत. तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही केलाय. तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याचं सांगतोय. अशावेळी महिला अधिकारी त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावत असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.



महिला अधिकाऱ्याच्या पतीला मटण बिर्याणी आवडते तर त्यांना चिकन बिर्याणी. फोनवर ऑर्डर देताना त्या हॉटेल चालकाने पैसे मागितल्यास हद्दीतील पोलीस निरीक्षकाकडे तक्रार करा, असंही त्या आपल्या कर्मचाऱ्याला सांगायला विसरत नाहीत. महिला अधिकाऱ्याच्या या कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे. भ्रष्टाचार वाढवणाऱ्या या अधिकारी महिलेची खाबुगिरी रोखण्याची आणि चौकशी करण्याची मागणी आता केली जात आहे.