पुणे : पुण्याच्या सिंहगड रस्त्यावर राजाराम पुलाजवळ महापालिकेच्या बसने एका तरुणीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात अॅक्टिव्हास्वार तरुणीचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्यानंतर पालिकेच्या असंवेदनशील कारभाराचा कळस पाहायला मिळाला.
यात संतापजनक बाब म्हणजे तरुणीचा मृतदेह पाऊण तास रस्त्यावर तसाच पडून होता. अपघातानंतर बघ्यांची गर्दी जमली, पोलिसही आले, मात्र त्या वेळेत एकही रुग्णवाहिका या तरुणीचा मृतदेह उचलण्यासाठी आली नाही. अपघातामुळे रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. त्यानंतर अखेर तिचा मृतदेह उचलण्यासाठी रुग्णवाहिका आली.
तरुणी सिंहगड रोडकडून पुण्याच्या दिशेने येत असताना पाठीमागून येणाऱ्या पीएमपीएमएल बसने सुप्रियाला धडक दिली. बसचं पुढचं चाक तिच्या डोक्यावरुन गेल्यामुळे सुप्रिया जागीच ठार झाली. तिचं वय 18 ते 20 वर्षाच्या दरम्यान असल्याचा पोलीसांचा अंदाज आहे.
महत्वाची बाब म्हणजे अपघात झाला त्यावेळी सुप्रियाने हेल्मेट घातले होते. मात्र दुर्दैवाने बसचे चाक डोक्यावरून गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.