Pune Water Cut : पुणेकरांवर मागील काही दिवसांपासून पाणी कपातीचं संकट ओढवणार का?, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच आता 18 मे पासून संपूर्ण पुणे शहरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 18 मे पासून आठवड्यातून दर गुरूवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे. 


यावर्षी अल निनोचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस कमी प्रमाणात होणार आहे. त्यातच सगळ्यांना पाणी पुरवठा जपून करावा किंवा पाण्याचं योग्य नियोजन करण्यात यावं, अशा सूचना देण्यात आल्या आहे. पाऊस भरपूर प्रमाणात आल तर हा प्रश्न मिटेल मात्र पावसाचं प्रमाण कमी झालं तर भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे खबरदारी म्हणून येत्या 18 मेपासून पुणे शहरात प्रत्येक गुरुवारी पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय (pune pmc water supply news) घेण्यात आला असल्याचं पाणी पुरवठा विभागाने सांगितलं आहे. 


20 ठिकाणी एअर व्हॉल्व बसवले आहेत. त्यामुळे दुसर्‍या दिवशी कमी दाबाने पाणी मिळते ही समस्या कमी होणार आहे. आगामी काळात पाऊस कमी पडला तर अत्यावश्यक प्लॅनिंग मनपा प्रशासन करीत आहे. आजूबाजूच्या गावातून टँकर आणता येतील तसेच टँक बंद ठेवता येतील. मुळशीमधून 5 टीएमसीची मागणी केली आहे.शासनाने एक सदस्यीय समिती नेमली होती. त्यांचा पाठपुरवठा सुरू असल्याची माहिती पालकमंत्र्यांना देण्यात आली आहे.


धरणांमध्ये आज घडीला 9.70 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध


पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आज घडीला 9.70 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. शेती तसेच उद्योगांना देखील धरणातून पाणीपुरवठा होत असतो. पुणे शहराचा पाणी वापर महिन्याला 1.5 टीएमसी इतका आहे. आठवड्यातील एक दिवस याप्रमाणे महिनाभर पाणी कपात केल्यास 0.25 टीएमसी पाणी वाचणार आहे. म्हणजेच पुण्याला किमान पाच ते सहा दिवस पुरेल इतकं पाणी वाचवण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. 


राष्ट्रवादीकडून टीका..


या निर्णयावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. पाण्याचं योग्य नियोजन न केल्याने पुणेकरांना मनस्ताप होणार असल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. 'पालकमंत्र्यांच्या निश्क्रीय व नियोजनशुन्यतेमुळे यावर्षी सर्वात जास्त पाऊस पडूनसुघ्दा  नियोजनाभावी पुणेकरांना मनस्ताप  आणि हाल सोसावे लागणार आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते प्रदीप  देशमुख यांनी केली आहे.