पुणे : पुणे महापालिकेत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे पुणेकरांवर 14 मार्चपर्यंत निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला आहे. पुणे महापालिका हद्दीत रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी कायम असेल. तर,अत्यावश्यक सेवा आणि शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना यात मुभा देण्यात आली आहे. तसंच अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही पुणे महापालिकेतर्फे सांगण्यात आलं आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील शाळा, महाविद्यालयं कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
दरम्यान महापालिका हद्दीत रात्री 11 ते सकाळी 6 संचारबंदी कायम ठेवण्यात येणार आहेत. तर,अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांना मुभा देण्यात येणार आहेत. तसंच अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं महापालिकेतर्फे सांगण्यात आलं आहे.
लग्न, समारंभास केवळ 200 जणांची उपस्थिती
विवाह सोहळ्यास किंवा समारंभास होणारी गर्दी लक्षात घेता, यावरही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्न, समारंभास केवळ 200 जणांची उपस्थितीच असावी लागेल, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हाही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील बंद अवस्थेत असलेले कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार
पुण्याच्या ग्रामीण भागातील बंद अवस्थेत असलेले कोविड केअर सेंटर लगेच सुरू करण्यात येणार आहेत..पुण्यातील बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात येतील.गरज भासल्यास जम्बो हॉस्पिटलही पुन्हा सुरू करण्यात येईल.