पुणे : माजी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी वानवडी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण यांना वानवडी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांनी ही नोटीस बजावली आहे.


त्यांना दिलेल्या नोटिशीमध्ये 'तुमची तक्रार लिहून घेतली असून त्यावर चौकशी करण्यात येईल असे तुम्हाला सांगण्यात आले आहे. तरी देखील तुम्ही आताच्या आता गुन्हा दाखल करावा यासाठी आंदोलन करत आहात. ही बाब शासकीय कामात अडथळा ठरते. आम्हाला कायदेशीर मार्गाने काम करू द्या अन्यथा तुमच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल' असे म्हटले आहे.


दरम्यान माजी मंत्री संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांच्या विरोधात पूजाचा गर्भपात करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी तृप्ती देसाई आणि पूजाची चुलत आजी म्हणून घेणाऱ्या शांताबाई चव्हाण यांनी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केले होते. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही अशाप्रकारे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.


संजय राठोड यांचा अखेर मंत्रीपदाचा राजीनामा
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आपला राजीनामा सादर केला आहे. या विषयावर मुख्यमंत्री आणि संजय राठोड यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली आणि अखेर संजय राठोड यांनी राजीनामा दिला.


राजीनामा देतो पण या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याचा स्वीकार करावा अशी काहीशी भूमिका संजय राठोड यांनी घेतली होती. आपले मंत्रिपद टिकावं म्हणून संजय राठोड शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा दबाव होता. या प्रकरणावरुन शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली जात होती.