पुणे : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आळंदी दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत सुरू असलेल्या गीता- भक्ती अमृत महोत्सवाला उपस्थिती लावली. यावेळी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन भूमीत लहानपणापासून येण्याची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचादेखील त्यांनी उल्लेख केला. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला मारलं त्यानंतर औरंगजेबाला कोणी विचारलं नसल्याचं ते म्हणाले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, मला आळंदीत येण्याचं सौभाग्य लाभलं. ज्ञानेश्वर महाराज यांच्या परंपरेला नमस्कार करण्यासाठी आळंदीत आलोय, लहानपणी मी ज्ञानेश्वरीच वाचन केले आहे, त्यांच्या आळंदीत येण्याची इच्छा होती. ज्यांनी 21 व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. त्यांच्या चरणी आज लीन होता आलं हे माझं भाग्य आहे. या कार्यक्रमाला श्री. श्री. गोविंद महाराज, बाबा रामदेव, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप घालून सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी
ते म्हणाले की, महाराष्ट्रात एकाच कुटुंबात चार संत होऊन गेले. त्यांचा आशीर्वाद आपल्याला शेकडो वर्षांपासून मिळतो आहे याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामी यांनी घडवलं. त्यांनी औरंगजेबच्या सत्तेला आव्हान दिले. औरंगजेबला असे मारले की आजपर्यंत औरंगजेबला कोणी विचारलं नाही. महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण इथं संतांचं सान्निध्य आहे. याच महाराष्ट्रात येऊन आज सगळ्या संतांचं दर्शन मला घेता येत आहे आणि शिवरायाच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी मला पाहता आल्याचंही योगी आदित्यनाथ म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांनी घेतली योगींची भेट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गीता- भक्ती अमृत महोत्सवाला भेट दिली. स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांचे अमृत महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांनी भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्याच्या महायज्ञात समिधा अर्पण करण्याचे कार्य सातत्याने केले आहे. स्वामीजींकडून देशाची आणि भारतीय विचारांची सेवा यापुढेही घडावी, अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर त्यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
इतर महत्वाची बातमी-