पुणे : पत्नी नांदायला येत नाही म्हणून एक तरुण चक्क विजेच्या टॉवरवर चढला, पत्नी माझ्यासोबत येणार नसेल तर मी आत्महत्या करणार अशी टोकाची भूमिका त्याने घेतली होती. एखाद्या चित्रपटाला साजेसं हे नाट्य पुण्याच्या जुन्नरमध्ये प्रत्यक्षात घडलं. केशव काळे असं हाय टेन्शन टॉवरवर चढलेल्या 23 वर्षीय तरुणाचे नाव आहे. पत्नीशी बोलणं करून देतो असं पोलिसांनी पटवून दिले. तेव्हा कुठे त्याचे मतपरिवर्तन झाले अन् तो टॉवरवरुन खाली आला आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. 


केशव मूळचा अहमदनगरच्या संगमनेरचा तर त्याची पत्नी पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील. दोघांची दोन वर्षांपूर्वी ओळख झाली. पुढे मैत्रीचे नाते प्रेमापर्यंत पोहोचले, दोघांनी कुटुंबाची संमती मिळवली अन् चार महिन्यापूर्वी ते विवाहबंधनात अडकले. उदरनिर्वाहासाठी दोघे पुण्याच्या चाकणमध्ये राहू लागले. पण केशवला मद्यसेवन करायची सवय, यातून त्यांचे वारंवार खटके उडू लागले. म्हणून एक एप्रिलला केशवने पत्नीला तिच्या माहेरी आणून सोडले. तेव्हापासून दोघांनी अबोला ठेवला. पुढे प्रकरण निवळेल असं वाटत असताना दुरावा वाढू लागला. सरतेशवटी 19 मे अर्थात काल केशव कुटुंबियांना घेऊन पत्नीच्या घरी पोहोचला. सर्वांनी तिला विनवणी केली, मात्र तिने नांदायला येणार नाही असा हट्ट कायम ठेवला. याचा भलताच राग केशवच्या डोक्यात बसला. तो तिथून उठला अन् 19 मे च्या दुपारी दोन वाजता हाय टेन्शन टॉवरवर चढला. पत्नी सोबत येणार नसेल तर मी जीव देणार अशी टोकाची भूमिका त्याने घेतली. हे पाहून त्याचे कुटुंबीय घाबरले, त्यांनी लागलीच पोलिसांशी संपर्क साधला. 


पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्याचे मतपरिवर्तन करायला सुरुवात केली, मात्र काही केल्या तो ऐकायला तयार नव्हता. अखेर पोलिसांनी त्याच्या पत्नीला तिथे बोलावलं. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे तिला नांदायला पाठवतो, असं पटवून दिले अन् त्याचे मतपरिवर्तन झाले. तासाभराच्या नाट्यानंतर तो टॉवरखाली उतरला आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. केशवने इतकं नाट्य घडवलं खरं पण शेवटी पत्नीचे काही मतपरिवर्तन झालेच नाही.