पुणे :  शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात शिक्षकांनाच पगार (Teacher) मिळत नसल्याचं चित्र आहे. पुणे महापालिकेकडून चालवल्या जात असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या 54 शाळांमधील कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या 260 शिक्षकांचे मागील चार महिन्यांपासून पगारच झालेले नाहीत. यामुळे या शिक्षकांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे.  आधी हे शिक्षक 10 तारखेनंतर काम बंद आंदोलन करणार होते मात्र प्रशासन सतत फक्त आश्वासने देतात आणि त्यावर आता आमचा विश्वास नाही, असं सांगत या शिक्षकांनी आंदोलन सुरू केलं. मागील वर्षातील चार महिन्यांचा पगारही त्यांना मिळालेला नाही.


पुणे पालिकेच्या 54 इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये असलेल्या 260 शिक्षकांचे गेल्या 4 महिन्यांपासून पगार झालेले नाहीत. जून महिन्यात रुजू होऊनही अद्याप त्यांचे पगार झाले नाहीत. "2023 मध्ये पालिकेकडून 260 जागांसाठी 2  वेळेला जाहिरात काढण्यात आली. पहिल्या वेळेत फक्त 166 शिक्षक भरती करून घेण्यात आले. गेल्या 7  वर्षांपासून कंत्राटवर भरती केली जाते मात्र वेतन होत नाही. यामुळे सतत शिक्षकांची पिळवणूक होते." असं हंगामी शिक्षक प्रवीण खेडकर सांगतात.  


या शिक्षकांचा पगार केवळ 20,000 आहे. तोही पगार मिळत नसल्यानं यांच्यासमोर घर कसं चालवायचं असा प्रश्न उभा राहिला आहे. सतत आश्वासने दिली जातात मात्र त्यावर कुठलेही ठोस पाऊल उचलले जात नाही. जर अशीच परिस्थिती राहिली तर आम्ही घर कसे चालवावे असा प्रश्न शिक्षकांनी  उपस्थित केला आहे.आणि प्रश्न फक्त शिक्षकांचा नाही आहे तर इथे शिकणाऱ्या मुलांच्या भविष्याचादेखील असल्याचं ते म्हणाले आहे. 


शिक्षकांची संख्या कमी


पालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत आधीच शिक्षकांची संख्या कमी आहे, अशी परिस्थिती असताना काम बंद आंदोलन केलं तर आमच्या मुलांच्या भविष्याचे काय? अशी भावना पालकांकडून देखील व्यक्त करण्यात आली. या हंगामी शिक्षकांनी त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना निवेदन दिलेत आणि आम्ही शाळेत उपस्थित राहू शकणार नाही असं सांगितलंय.  सगळ्याच शिक्षकांची वेतन न मिळाल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. प्रशासनाने कायमस्वरूपी भरती करावी आणि त्यांचे हक्काचे वेतन त्यांना मिळावेx अशी साधी अपेक्षा या शिक्षकांची आहे. जर परिस्थिती अशीच राहिली आणि शिक्षकांनी काम बंद आंदोलन केलं तर विद्येच्या या माहेरघरात मुलांना गुणवत्तेचं शिक्षण मिळतंय का?, असा प्रश्न उपस्थित होतो.


इतर महत्वाची बातमी-


Pune School News : एक शाळा, एक शिक्षक, एकच विद्यार्थिनी; एका विद्यार्थिनीला शिकवण्यासाठी शिक्षिकेचा डोंगरदऱ्यातून 45 किमीचा प्रवास