Pune Dagdusheth Halwai Ganpati Mandir :  चैत्र महिन्यात वसंत ऋतू मध्ये विविध फुलांना (Dagdusheth Temple) बहर येत असतो, त्यातीलच एक असलेल्या सूर्यफुलांचा अभिषेक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला करण्यात आला. मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत तब्बल 21 हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर परिसर खुलून दिसत आहे. अनेक भाविक ही आरास पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. 


श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे व सकाटा सीड इंडिया प्रा.लि. कंपनीच्या वतीने दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पहिल्यांदाच 21 हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली. सकाटा सीड इंडिया प्रा.लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.जय सिंग यांनी उपक्रमाकरिता विशेष सहकार्य केले आहे. सजावटीमध्ये लावण्यात आलेल्या सूर्यफुलांमध्ये तेलबिया येत नसून या फुलांचा वापर केवळ सजावटीसाठी केला जातो. फुलांच्या पाकळ्यांचा रंग गडद भगवा असून मध्यभाग काळा आहे. ही फुले दिसायला खूप आकर्षक असून शेतातून काढल्यानंतर 7-8 दिवस पाण्यामध्ये व्यवस्थित राहतात. मंदिराच्या कळसावर लावण्यात आलेल्या फुलांवर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे ही फुले अधिकच उठून दिसत आहेत. भाविकांनी ही आरास पाहण्यासोबतच हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याकरता मोठी गर्दी करत आहेत.


प्रत्येक सणाला किंवा विशेष दिवशी दगडूशेठ गणपती मंदिराला सुंदर सजावट करण्यात येते. कधी आंब्याची आरास असते तर कधी मोगऱ्याच्या फुलाने संपूर्ण मंदिराला शुभ्र सजावट करण्यात येते. त्यासोबतच फळांचीदेखील आरास करण्यात येते ही आरास पाहण्यासाठी नागरिक खास गर्दी करत असतात. मंदिरांच्या दुतर्फा भाविकांच्या रांगाच रांगा बघायला मिळतात. 


सजावट टिपण्यासाठी भाविकांची गर्दी


सुंदर सजावट पाहण्यासाठी भाविकांच्या रांगा बघायला मिळतात. ही सजावट आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी गर्दी करतात. शिवाजी रस्त्यावरुन प्रवास करणारा प्रत्येक नागरिक आपल्या मोबाईलमध्ये मंदिर सजावटीचे फोटो टिपताना दिसत आहे. त्यासोबतच बाप्पाचा आशीर्वाद घेत आहेत. या सजावटीमुळे मंदिर परिसराची शोभा वाढली आहे आणि मंदिर परिसरात प्रसन्न वातावरण निर्माण झालं आहे.


काही दिवसांपूर्वी 2 हजार किलो द्राक्षांची आरास 


काही दिवसांपूर्वी दगडूशेठ मंदिराला 2 हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा सजला होता. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या दाक्षांची सजावट करण्यात आली होती.