Pune Accident News :  मागील काही दिवसांपासून जुन्नरमध्ये (Pune Accident News) अपघाताचं सत्र थांबताना दिसत नाही आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यात भीषण अपघात झाला. अहमदनगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटाजवळ इनोव्हा आणि पिकअप कारची समोरासमोर धडक झाली. यात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी (3 एप्रिल) रात्री नऊच्या सुमारास वाटखळ गावाजवळ हा भीषण अपघात झाला. इनोव्हाच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरुन येणाऱ्या पिकअप जीपला तिने जोरात धडक दिली आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. इनोव्हा गाडी ही कल्याणकडून आळेफाटाकडे चालली होती. तर पिकअप कल्याणच्या दिशेने चालला होता.


रात्री 9 वाजता माळशेज घाट परिसरात असणाऱ्या वाटखळ गावाजवळ पिकअप आणि इनोव्हा गाडीची समोरासमोर धडक झाली. इनोव्हा गाडीच्या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामुळे जुन्नरमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी वाहनात अडकलेले मृतदेह बाहेर काढले आहेत. मृतांची नावे अद्याप समोर आली नसून इनोव्हा गाडी ही कल्याणकडून आळेफाट्याकडे चालली होती त्यादरम्यान हा अपघात झाला.


कल्याण-नगर मार्ग धोक्याचा


कल्याण-नगर मार्ग हा अपघाताचा मार्ग बनत चालला आहे. काही दिवसांपूर्वी शेतमजुरीची काम करुन पारनेरला घराकडे निघालेल्या शेतमजुरांना पिकअप जीपने चिरडल्याची घटना घडली होती. नगर कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे हा अपघात झाला होता. या घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यात दोन मुली, दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता. सगळे शेतमजूर शेतीची सगळी कामं आटपून पारनेरला निघाले होते. त्यावेळी रात्रीच्या सुमारास अंधारात पिकअप जीपने एक दोन नाही तर आठ जणांना चिरडलं होतं. या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.


अपघाताचं सत्र थांबेना


पुणे जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यात अनेकांचे नाहक जीव जात आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.