पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या रायरेश्वर किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्वर किल्ल्याचं एक भौगोलिक वैशिष्ट्य देखील आहे. ते म्हणजे या किल्ल्यावरील टेकडीवर एकाच ठिकाणी सात वेगवेगळ्या रंगांची माती आढळते. पुण्यातील पर्यावरण आणि विज्ञान विषयातील अभ्यासकांनी या टेकडीच्या वैशिष्ट्यांची शोध सुरु केला आहे.


पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रायरीचा किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वतांपैकी एक मानला जातो. या किल्ल्याशी निगडित इतिहासाची माहिती अनेकांना असते. पण इतिहासाबरोबरच इथला भूगोलही वैशिष्ट्यपूर्ण आहे. 


छत्रपती शिवाजी महाराजांनी या रायरेश्वराच्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली आणि कार्याचा श्रीगणेशा केला. या जाज्वल्य इतिहासाबरोबरच या किल्ल्याचा भूगोलही आगळावेगळा आहे. या किल्ल्यावर एक दोन नव्हे तर चक्क सात रंगांची माती एकाच ठिकाणी आढळते. ती इथेच का आढळते आणि या मातीची वैशिष्ट्ये काय आहेत अभ्यासक घेत आहेत. 


रायरेश्वर किल्ल्यावर जाणारी वाट दुर्गम आहे. शिड्यांचा आधार घेतल्याशिवाय आज देखील गडावर पाऊल ठेवता येत नाही. चिंचोळी वाट चढून वर आल्यावर रायरेश्वराचं भव्य पठार तुमचं स्वागत करतं. शेकडो एकर पसरलेल्या या पठाराच्या मधोमध आहे रायरेश्वराचं पुरातन मंदिर. 


रायरेश्वराच्या या स्वयंभू पिंडीला साक्षी मानून छत्रपतींनी स्वराज्याचा संकल्प सोडला आणि आणि तो सिद्धीस नेला. हा झाला इतिहास. इतिहासाचे साक्षीदार असलेल्या या मंदिराच्या पाठीमागे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकडीवर भूगोलाचा एक खजिना दडला आहे. 


रायरेश्वर किल्ला पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर उभा आहे. या किल्ल्याच्या उत्तरेला असलेल्या टेकडीवर जाणारी वाट झाडाझुडपातून जाते. ही झुडपं पार करुन जेव्हा आपण टेकडीच्या माथ्यावर पोहोचतो तेव्हा समोरचं दृष्य पाहून अवाक् होतो. 


या रंगीत टेकडीवरील माती जांभळी आहे. खालच्या बाजूला असलेल्या मातीचा रंग पिवळसर आहे तर वरच्या बाजूला असणारी माती लाल आहे. पलिकडे असणारी माती गुलाबी झाली आहे तर खालच्या बाजूला या मातीचा रंग करडा होत गेला आहे. जवळपास सात ते आठ मातीचे रंग इथे दिसतात.


कोट्यवधी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून सह्याद्रीची आणि सह्याद्रीतील काळ्या पाषाणाची निर्मिती झाली. पुढे या पाषाणावर निसर्गातील इतर घटकाचा परिणाम होऊन वेगवेळ्या रंगांचे दगड आणि त्या दगडांपासून माती तयार व्हायला लागली. 


या सगळ्याचा बेस आहे पाषाण. या पाषाणावर ऊन, वारा, पाऊस या घटकांचा परिणाम होऊन जांभा खडक तयार झाला आणि त्यावर प्रक्रिया होत जाऊन रंगीबेरंगी माती अस्तित्वात आली. 


मातीचे वेगवेगळ्या रंगांचे थर तर अनेक ठिकाणी दिसून येतात. परंतु सगळे रंग आणि या रगांच्या वेगवेगळ्या छटा एकाच ठिकाणी आढळणं दुर्मिळ आहे. 


काळ्या पाषाणात रुपांतर इथ जांभा खडकात झालं आहे आणि त्याला लाल, गुलाबी, काळा, पिवळसर अशा वेगवेगळ्या छटा प्राप्त झाल्या आहेत. या दगडाप्रमाणेच रायरेश्वराचे स्थानही वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा किल्ला पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. डाव्या बाजूला पुणे जिल्ह्याचा भाग आहे तर समोरच्या बाजूला सातारा जिल्ह्यातील वाईचा परिसर आहे.


इथल्या या रंगीत मातीच्या वैशिष्ट्यांची माहिती जसजशी लोकांपर्यंत पोहोचतेय तसा पर्यटकांचा ओघ वाढत आहे. किल्ल्यावर राहणाऱ्या काही मोजक्या कुटुंबांची उपजीविका या पर्यटकांवरच अवलंबून आहे. परंतु या पर्यटकांना आवश्यक असलेल्या रस्ते आणि दळणवळणाच्या सुविधांचा इथे अभाव आहे. या सुविधा इथे निर्माण झाल्या तर किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार आहे. 


पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील पर्यावरण अभ्यासकांनी या टेकडीवरील मातीचा अभ्यास सुरु केला आहे. अशी वैशिष्ट्ये सह्याद्रीत ठिकठिकाणी विखुरली आहेत. सह्याद्रीत दडलेल्या अशा अनेक रहस्यांचा उलगडा होण्यासाठी त्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास होण्याची गरज आहे. 


या रंगीत मातीप्रमाणेच सह्याद्रीत अनेक गुपितं दडली आहेत. त्यांचा अभ्यास व्हायला हवा. त्यासाठी दृष्टी आणि दृष्टिकोन दोन्ही खुला ठेवण्याची गरज आहे. ज्यामुळे सह्याद्री किती संपन्न आहे, किती सुंदर, आहे किती समृद्ध आहे हे आपल्याला अनुभवता येणार आहे.