पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुणे (Pune Crime News) पोलिसांच्या कंट्रोल रुमला मुंबईत दहशतवादी शिरल्याची माहिती देणारा फोन आला आहे. आज सकाळी हा फोन पुणे कंट्रोल रुमला आला. विदेशातील नंबर असल्याने आणि मुंबईत दहशतवादी शिरल्याची माहिती मिळाल्याने यासंदर्भातील माहिती पुणे पोलिसांनी मुंबई पोलिसांना दिली आहे.
या फोनचा संपूर्ण तपास केल्यानंतर हा फोन थेट अमेरिकेतून आल्याचं समोर आलं होतं. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला आज सकाळी एक फोन आला. फोन करणार्याने मुंबईतील वरळीच्या एपिक कॅपिटल कार्यालयात दहशतवादी शिरला असल्याचे सांगून फोन कट केला. ही माहिती तातडीने मुंबई पोलिसांना देण्यात आली. मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात हा फोन अमेरिकेतून आल्याचे निष्पन्न झाले आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सॉफ्टवेअरच्या मदतीने असे कॉल हे स्थानिक पातळीवरुन केले जातात. मात्र, त्यात लोकेशन हे दुसरे दाखविता येते, असाच प्रकार कोणी केला आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत. मात्र हा फेक कॉल असल्याची पोलिसांना शंका आहे.
राज्यात सध्या NIA मॉड्यूल सक्रिय आहे. राज्यातील विविध भागात वावरणाऱ्या दहशतवाद्यांना NIA आणि ATS ने जेरबंद केलं आहे. पुणे, मुंबई, गोंदिया या शहरातून दहशतवाद्यांना NIA ने अटक केली आहे. हेच मॉड्युल सक्रिय असताना पुणे कंट्रोल रुमला असा फोन आल्याने काही वेळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनांचा पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा फोन गांभीर्याने घेतला आहे. पुणे पोलिसांनी याबाबतची माहिती लागलीच मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला दिली आहे.
खरंच दहशतवादी लपलाय की फेक कॉल?
राज्यात विविध ठिकाणी दहशतवाद्यांचा कट NIA ने उधळून लावला आहे. 15 ऑगस्टला ब्लास्ट करायच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना NIA आणि ATS ने विविध ठिकाणी छापेमारी करत अटक केली होती. या सगळ्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर येत होती. अशी परिस्थिती असताना अशा प्रकारचा फोन आल्यानं खळबळ उडाली. त्यामुळे तत्काळ मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आली. अमेरिकेतून फोन आल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र हा फोन खरा होता की फेक होता, याबाबत अजूनही शंका व्यक्त कऱण्यात येत आहे.
इतर संबंधित बातमी-
Pune Crime news : तीनपत्ती खेळण्यासाठी 'तो' करायचा घरफोडी मात्र पोलिसांनी प्लॅन हाणून पाडलाच!