Pune crime news : पूर्ववैमनस्यातून पोलिसांकडे (Pune Crime News) तक्रार केल्यामुळे अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वार करुन एकाचा हात तोडल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्यातील कात्रज परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलं आणि त्यासोबतच आठ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठल्याचं अशा घटनांमधून समोर येत आहे. अखिलेश ऊर्फ लाडप्पा चंद्रकांत कलशेट्टी असे या तरुणाचे नाव आहे. सुदैवाने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करुन त्याचा पंजा पुन्हा जोडला आहे.
याप्रकरणी अभिजीत दुधनीकर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन पोलिसांनी या अल्पवयीन मुलांवर कारवाई केली आहे. त्यावरुन पोलिसांनी निखिल ऊर्फ रोहित गोरख दिनकर याला अटक केली आहे. रोहित बोद्रे, प्रेम गुंगारग, युवराज देवकाते त्यांच्या साथीदारासह तिघा अल्पवयीनांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सुखसागरमधील स्मार्ट मेन्स पार्लरसमोर बुधवारी दुपारी साडेचार वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडप्पा, रोहीत बोद्रे आणि इतरांमध्ये जुनी भांडणे आहेत. त्यांच्यात मागील अनेक दिवांपासून अनेक कारणावरुन किरकोळ वादावादी सुरु होती. तक्रारदार आणि लाडप्पा हे 22 मार्चला सुखसागर परिसराकडे जात असताना दुचाकीवरुन आले आणि त्यांचा पाठलाग करत होते. लाडप्पा यांनी आपल्या गाडीचा वेग कमी केला त्यांना या आरोपींनी घेरलं. तुम्ही केस करता का आमच्यावर थांबा आता तुमचा मर्डर करतो, मारुन टाकण्याची धमकी दिली.
थेट पंजाच तोडला
त्यावेळी त्यांनी धारदार कोयत्याने वार करायला सुरुवात केली. त्यांनी हाताने हा वार हुकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या हाताला दुखापत झाली. त्यावेळी त्यांना पकडून मारहाणदेखील करण्यात आली. त्यांच्या डोक्यावर देखील आरोपींनी जोरात वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र डोक्यावरचा वार वाचवण्यासाठी त्यांनी हात पुढे केला आणि हा वार थेट हाताच्या मनगटावर बसला. वार प्रचंड रोषाने आल्याने डाव्या हाताचा थेट पंजाच तुटला.
परिसरात तणावाचे वातावरण
हा सगळा प्रकार पाहून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. लोकांनी हा थरार प्रत्यक्ष बघितला आणि लोकांनीही घाबरलेल्या अवस्थेत पळ काढला. मात्र मित्रांनी त्यांना लगेच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आणि डॉक्टरांनी लगेच शस्त्रक्रिया करत त्यांचा हात जोडला. मात्र या घटनेमुळे काही वेळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.