Pune APMC Election : पुण्यातील  कृषी उत्पन्न बाजार (Pune APMC Election) समितीवर राष्ट्रवादी (बंडखोर) आणि भाजपच्या पॅनलची सत्ता आली आहे. अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला 18 पैकी 13 जागा जिंकण्यामध्ये यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर हा एक मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी भाजपच्या मदतीने चांगलीच बाजी मारली आहे. 


तब्बल 20 वर्षांनी पुणे बाजार समितीची निवडणूक पार पडली. त्यामुळे या बाजार समितीच्या निकालाकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यात आता बंडखोरांनी भाजपच्या मदतीने बाजार समिती निवडणुकीत सत्ता काबीज केल्याने चर्चेला उधाण आलं आहे.


मावळमध्ये महाविकास आघाडी एकहाती सत्ता; बाळा भेगडेंना पुन्हा एकदा झटका


पुण्याच्या मावळमध्ये महाविकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवला आहे. भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंना पुन्हा एकदा झटका दिला. मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर मविआचे 17 तर भाजप-शिंदे गटाच्या एका सदस्याची वर्णी लागली आहे. मविआच्या 17 सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 तर काँग्रेसच्या दोघांचा समावेश आहे. या विजयानंतर मविआने मोठा जल्लोष केला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा आणि बाजार समितीला नवसंजीवनी देण्याचा विश्वास मविआने व्यक्त केला आहे.


भोरमध्ये कॉंग्रेसची एकहाती सत्ता


भोरमध्ये  कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. भोर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. काँग्रेस विरुद्ध सर्व पक्ष एकत्र लढल्यानंतरही 18 पैकी 18 जागांवर काँग्रेस विजयी झाले आहे. काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंनी यंदा भोरचा गड राखला आहे. निवडणुकीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना पक्ष एकत्र लढूनही काँग्रेसच वरचढ ठरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुरुवातीला ही निवडणूक काहीशी चुरशीची वाटत होती. मात्र त्यानंतर कॉंग्रेस अग्रेसर होतं. 


खेडमध्ये दिलीप मोहिते पाटील काठावर पास


पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात मतदान  झाल्यावरच मतमोजणी करण्यात आली. कालच खेड बाजारसमितीचं चित्र स्पष्ट झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील काठावर पास झाले. त्यांच्या सर्व साधारण मतदार संघात ते शेवटच्या म्हणजे सातव्या क्रमांकावर राहिले आहेत. 1267 पैकी 589 मतं त्यांना मिळाली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता कायम राखण्यातही यश आलं आहे. एकूण 18 जागांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला 10, सर्वपक्षीयांना 6, त्यात उद्धव ठाकरे शिवसेना 3, भाजप 2 आणि काँग्रेस 1 आणि अपक्ष 2 असा निकाल लागला आहे. त्यामुळे खेडमध्ये राष्ट्रवादीनं आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे.


संबंधित बातम्या:


Parbhani News : परभणीतील काट्याच्या लढतीत महाविकास आघाडीचा 3 तर भाजपचा 2 ठिकाणी विजय