Pune News : पिंपरी चिंचवडमधील विविध भागात खंडित (Power outage in Pune) झालेली वीज पाच तासाने पूर्ववत झाली. वीज खंडित झाली तेंव्हापासून शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. सकाळी सहाच्या सुमारास 400 केव्ही ही अतिउच्च दाबाच्या वाहिनीत तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळं रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र आणि सेक्टर 23चं जलशुद्धीकरण केंद्रही बंद होतं. ते अकरा वाजतानंतर सुरू झालं. आता शहरभर विस्कळीत झालेला पाणी पुरवठा दिवसभरात सुरळीत करण्याचे प्रयत्न पालिकेकडून सुरू आहेत.


महापारेषणच्या लोणीकंद आणि चाकण या दोन्ही महत्वाच्या 400 केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये 5 ठिकाणी बुधवारी पहाटे 4.30 च्या सुमारास बिघाड (ट्रीपिंग) झाला. त्यामुळे कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर, पिंपरी आणि चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात सकाळी 6 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित झाला होता. परंतु, आता वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. 


अतिशय दाट धुकं आणि दवं यामुळे या टॉवर लाईनमध्ये बिघाड झाल्याची शक्यता असल्याचं महापारेषणकडून सांगण्यात आलं होतं. तसेच महत्वाचे दोन 400 केव्ही अतिउच्च दाब उपकेंद्र बंद असल्यानं पर्यायी वीज पुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान महावितरणाकडून याबाबतची माहिती वीज ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे देण्यात येत आहे.


महापारेषणचे सर्व वरिष्ठ अभियंता सध्या टॉवर लाइनमधील बिघाड शोधण्यासाठी युद्धपातळीवर पेट्रोलिंग करत आहेत. सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागू शकतो. सकाळी 11 वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होऊ शकेल. या कालावधीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावं, असं आवाहन महापारेषण आणि महावितरणकडून करण्यात आलं आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha