पुणे : पुण्यात दिवंगत खासदार गिरीष बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली नाही. त्यामुळे आता सर्वपक्षीयांनी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यातच मनसेनेदेखील जोरदार तयारीला लागल्याचं चित्र आहे. मनसेचे फायर ब्रॅंड नेते वसंत मोरे  (Vasant More))यांच्या बॅनरची सध्या पुणे शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. पुणे शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात देखील वसंत मोरे यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. मनसेचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गणेश भोकरे यांनी हे बॅनर लावले आहेत. 


या बॅनरवर काय लिहिलं आहे? 


येत्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी वसंत मोरे इच्छूक आहेत. त्यासाठी त्यांनी तयारीदेखील सुरु केली आहे. विविध ठिकाणाचे विकास कामं, जनता दरबार भरवून नागरिकांच्या समस्या सोडवतात. त्यामुळे पुण्याची पसंत मोरे वसंत, असा वसंत मोरे यांचा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. त्यासोबतच पुणे शहर लोकसभेसाठी सक्षम नेतृत्वदेखील या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मनसेकडून पुणे लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून अमित ठाकरे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने अमित ठाकरे  पुण्यातील विभाग अध्यक्षांच्या एक बैठका घेत आहेत.


वसंत मोरेंची क्रेझ?


यापूर्वी पुण्यात कात्रज चौकात आणि बाकी सगळीकडे वसंत मोरे यांचे बॅनर्स झळकले होते. त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे जरी हे बॅनर्स होते तरी या बॅनर्सवर भावी खासदार लिहिलेलं असल्याने या बॅनर्सची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे होती. त्यांच्या जनता दरबार पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील ते अनेकांच्या समस्या सोडवत असतात. थेट फेसबुक लाईव्ह करुन त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला आहे.  पुण्यात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळेच सगळीकडे त्यांचे बॅनर्स झळकताना दिसत आहे.


पुणे जिल्हातील गावागावात पक्षबांधणीला सुरुवात


मागील काही दिवसांपासून वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर नाराज होते. त्यामुळे तडफदार नेते काही दिवसांपासून दुसऱ्या पक्षात जाणार अशी चर्चा होती. त्यामुळे वसंत मोरे हे मनसेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेत प्रवेश घेणार असल्याची सगळीकडे चर्चा सुरु होती. मात्र वसंत मोरे जागेवरुन हलले नाहीत त्यांनी मनसे सोडणार नाही, असं अनेकदा बोलून दाखवलं. आता मनसेकडूनही पुणे जिल्हातील गावागावात पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. त्याची जबाबदारी वसंत मोरे यांना देण्यात आली आहे. त्यात ते सध्या बारामतीकडे जास्त लक्ष देत आहे. या मतदार संघात मनसे वाढवण्याच्या तयारी दिसत आहे. 


इतर महत्वाची बातमी-


'सौ सुनार की एक लोहार...'; भुजबळांच्या सभेची सुरवातच जरांगेंवरील टीकेने; म्हणाले...