पुणे: पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात खराब हवामानामुळं हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. सालतर गाव परिसरात ही मोठी दुर्घटना टळलेली आहे. पंधरा ऑगस्टच्या या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेनं हेलिकॉप्टरनं टेक ऑफ घेतलं, तेव्हा टेक ऑफच्या दृष्टीने हवामान उत्तम होतं. तेव्हा दुपारच्या सव्वा तीनची वेळ होती. काही वेळात हे हेलिकॉप्टर मुळशी तालुक्यात पोहचलं. पावसाळ्यात या भागात नेहमीचं धुकं आणि रिमझिम सुरु असते. पंधरा ऑगस्ट ही तशीच परिस्थिती होती. त्यामुळं मुळशी तालुक्यात हेलिकॉप्टर भरकटले पण त्याचवेळी पायलटने प्रसंगावधान दाखवत, सुरक्षित लँडिंग केलं.
एका बाजूला मुळशी धरण आणि दुसऱ्या बाजूला अँबी व्हॅलीची दरी अशा संकटात हेलिकॉप्टर अडकलं होतं. मात्र दोन्ही पायलटने गावा लगतच्या मंदिराकडे जाणाऱ्या सिमेंटच्या रस्त्यावर हेलिकॉप्टरचं लँडिंग झालं, तेव्हा दुपारचे 3 वाजून 35 मिनिटं झाली होती. या हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट आणि चार प्रवासी असे एकूण सहा जण होते. या सहा जणांचा जीव टांगणीला होता. ही धक्कादायक घटना गावाच्या मंदिरात उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. पुढच्या पाच मिनिटांत हवामान अनुकूल झालं आणि हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने टेक ऑफ झालं.