पुणे : दर महिन्याला दहा किंवा अकरा कोटी लसीचे डोस देणे अवघड आहे. जगात कोणतीही कंपनी एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन करू शकत नाही. त्यामुळे लस देण्यासंदर्भातील आकड्याबाबत  राजकारणी थापा मारतात, असे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला म्हणाले. तसेच दोन वेगवेगळ्या लसीचं कॉकटेल करण्याच्या निर्णयाला माझा  विरोध असल्याचे देखील पूनावाला या वेळी म्हणाले. 


दोन लसींचे कॉकटेल करण्याच्या मी विरोधात


कोरोनावरील दोन लसींचे कॉकटेल करण्याच्या मी विरोधात आहे  कारण ते कॉकटेल परिणामकारक ठरले नाही तर ज्या दोन लसींचे कॉकटेल तयार करण्यात आले असेल त्या कंपन्या एकमेकांना दोष देतील. लॉकडाऊन नसायला हवा कारण लॉकडाऊन नसेल तर लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होईल, अशी देखील भूमिका त्यांनी लॉकडाऊन संदर्भात मांडली.


कोव्हिशिल्ड लस अगोदर पुण्याला देण्याची मागणी


कोरोनाचा सर्वाधिक फटका राज्यातील मुंबई आणि पुणे या दोन मुख्य शहरांना बसला. पुण्यातील रुग्णसंख्या ही मधल्याकाळात मुंबईपेक्षा  जास्त होती. त्यामुळे पुण्यात असणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होणाऱ्या कोव्हिशिल्ड लसी आधी पुण्यात द्याव्यात अशी मागणी केली होती. मात्र त्यावर काही ठोस निर्णय झाला नाही. मोदी सरकारने या बद्दल काहीच उत्तर दिले नसल्याचा  खुलासा देखील  सायरस पूनावाला यांनी यावेळी  केला आहे.


मोदी सरकारने लस परदेशात पाठवायला बंदी घालून अन्याय केला


 पूनावाला म्हणाले, मोदी सरकारने लस परदेशात पाठवायला बंदी घालून अतिशय वाईट गोष्ट केली आहे.  माझा मुलगा मला म्हणाला की, यावर तोंड उघडू नका पण मी यावर बोलणार आहे.  कारण सिरम इन्स्टिट्यूट अनेक वर्षांपासून जगातील एकशे सत्तर देशांना लस पुरवते.  पण आता त्यांना गरज असताना त्यांना लस देता येत नाही. या देशांनी लसीसाठी आधीच पैसै दिलेत. बिल गेट्सने पाच हजार कोटी रुपये दिलेत.
 


तिसरा बुस्टर डोस घ्यायला हवा


 लसीच्या किमतीत बदल झाल्याने सीरमचा नफा मोठ्या प्रमाणात बुडाला पण भारतातील लोकांना लस मिळावी यासाठी आम्ही तो सहन केला. सीरमची लस ही जगातील सर्वांत स्वस्त आहे. कोव्हिशील्ड लस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी शरीरातील अॅन्टीबॉडीज कमी होतात असा रिपोर्ट लॅन्सेटमध्ये छापून आलाय. ते खरे आहे.  त्यामुळेच तिसरा बुस्टर डोस घ्यायला हवा.  मी स्वतः तिसरा बुस्टर डोस घेतलाय, असे देखील पूनावाला यावेळी म्हणाले.


 


मोदी सरकारने निर्णय प्रक्रियेत गतिमानता आणली


मोदी सरकारने निर्णय प्रक्रियेत गतिमानता आणली. ड्रग्ज कंट्रोलरला परवानग्या देण्यास वेळ लागू दिला नाही.  त्यामुळेच लस वेळेत उपलब्ध झाली, असे मोदींचे कौतुक देखील त्यांनी या वेळी केली.


लोकमान्य टिळकांचे स्वदेशी लसीचे स्वप्न पूर्ण


 लोकमान्य टिळकांनी प्लेगच्या साथीवेळी भारतीय बनावटीच्या लसीचे स्वप्न पाहिले होते ते आज पुर्ण झाले. स्मॉल स्केल इंडस्ट्रिजच्या स्वरूपात  1966 साली सीरम इन्स्टिट्यूटची स्थापना केली. त्यावेळी कल्पनाही केली नव्हती की एक दिवस ही कंपनी जगातील सर्वात मोठी व्हॅक्सिन तयार करणारी कंपनी बनली आहे, असे पूनावाला म्हणाले.