अहमदनगर : बारामतीप्रमाणेच (Baramati Lok Sabha Election)  अहमदनगरमध्ये भाजपनं पैसे वाटल्याचा आरोप शरदचंद्र पवार गटाकडून करण्यात आला आहे.  भाजप पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पैसे वाटतानाच व्हिडीओ समोर आला आहे.  या व्हिडीओची तपासणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.  अहदनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंनी (Nilesh Lanke)  हा पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे


निलेश लंके यांनी  तीन व्हिडीओ शेअर केले आहे. पहिल्या व्हिडीओमध्ये भाजप पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पैसे वाटतानाच व्हिडीओ समोर आला आहे. निलेश लंके म्हणाले,  बारामतीसारखी पैसे वाटपाची पुनरावृत्ती अहमदनगर लोकसभा क्षेत्रात सुद्धा भाजपने कायम ठेवली. परंतु या धनशक्तीला जनशक्ती पुरून उरणार. भाजपा पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे याला पैसे वाटतानाच्या या व्हिडीओची शहानिशा करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी.


नेमकं काय घडलं? 


पारनेरचे भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचे कार्यकर्ते आणि निलेश लंके यांचे कार्यकर्ते भिडले. मध्यरात्री भर रस्त्यात दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडले.   पैशाने भरलेली बॅग रस्त्यावर पडल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. संबंधित पैसे मतदारांना वाटण्यासाठी आणले असल्याचा लंकेंच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे.  तर काही महिलांनी आपल्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.  पारनेर पोलिसात अद्याप गुन्हा दाखल नाही. पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे ही घटना घडली आहे. 


निलेश लंके काय म्हणाले?


निलेश लंके म्हणाले, ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती  अशी आहे.  अहमदनगरमध्ये  विखे परिवाराकडून  पैशांचा पाऊस पडला आहे.या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर देखील झाला. अहमदनगर लोकसभेतील जनता स्वाभिमानी आहे, ती भाजपच्या पैशांच्या मोहाला आणि दमदाटीला बळी पडणार नाही.  भाजपला पराभव समोर दिसत आहे, त्यामुळे या गोष्टी घडतना  दिसत आहे.






 हा व्हिडीओ समोर आल्यानंतर दोन गटात मोठ्या प्रमाणात तणाव  निर्माण झाला. मतदानाच्या आदल्या दिवशी हा प्रकार समोर आल्यानंतर गावात मोठा तणाव निर्माण झाला.    घडलेल्या प्रकरानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. परंतु पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.    संतप्त कार्यकर्त्यांकडून विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचे खिसे आणि वाहने तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. 


हे ही वाचा :


राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल