Pune Sinhagad News : सिंहगडावर अतिक्रमण (sinhagad fort) कारवाईला सुरुवात झाली आहे. पोलीस आणि अतिक्रमण विभागाकडून (pune) कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे दिवसभर पर्यटकांना गडावर जाण्यास बंदी करण्यात आली आहे. पहाटेपासून वन विभागाकडून सिंहगडावरील अतिक्रमण कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान नोंदणी नसलेल्या व्यावसायिकांचे शेड जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. 


सिंहगडाचं रुप एखाद्या चौपाटीसारखं झालं आहे. लहान मुलांच्या प्लास्टिकच्या खेळण्यांपासून अनेक वस्तुची दुकानं देखील गडावर आहेत. सिंहगडावर एकून 110 पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत. गडाच्या पार्किंगपासून तर गडावर देखील मोठ्या प्रमाणात जागोजागी स्टॉल्स दिसतात. या स्टॉल धारकांचं अतिक्रमण रोखण्यासाठी नोटीसा देण्यात आल्या होत्या. मात्र विक्रेत्यांनी या नोटीसांकडे दुर्लक्ष केल्याने वनविभागाने कडक कारवाई करण्याचा आणि संपूर्णपणे प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर सोमवारपासून प्लास्टिक बंदी अधिक कडक करण्यात येणार आहे. प्लास्टिकच्या आवरणात विकले जाणारे वेफर्स, नूडल्स यासारखे पदार्थ गडावर विकण्यास आणि नेण्यास मनाई असणार आहे. ही बंदीचं पालन न करणाऱ्यांकडून शंभर ते पाचशे रुपये दंड वसूल करण्यात येईल, असं वन विभागाने म्हटलं आहे. 


नोटीसांकडे विक्रेत्यांचं दुर्लक्ष


अनेकदा नोटीसा देऊनही विक्रेत्यांनी आपली दुकानं हलवली नाहीत. दहा वर्षापूर्वी सिंहगडावर खाद्यपदार्थांचे मोजकेच स्टॉल्स होते. अनेकांच्या गडावर जमिनी असल्याने ते अनेक वर्षांपासून सिंहगडावर पिठलं-भाकरी किंवा दही-ताक विक्री करतात. मात्र मागील काही वर्षात सिंहगडावर येणाऱ्या ट्रेकर्सची आणि पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे व्यावसायिकांची भरघोस कमाई देखील होत आहे. त्यामुळे मिळेल त्या जागी टपऱ्या किंवा लहान दुकानं उभारली गेली आहेत. मात्र आता या सगळ्यांनाच प्लास्टिक विक्री आणि खरेदीवर बंदी घालण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा लाडका सिंहगड किल्ला आता प्लास्टिकमुक्त होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


प्लास्टिक वापरावर बंदी; उल्लंघन केल्यास कडक करावाई
अनेक लोक खास पिठलं-भाकरी खाण्यासाठी सिंहगडावर जातात. मात्र आता या हौशी पर्यटकांना सिंहगडावर सोमवारपासून शिस्त बाळगावी लागणार आहे. गडावर सगळ्या प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे आणि येत्या सोमवारपासून प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. सिंहगडावर पिण्याच्या पाण्याची सोय झाली की प्लास्टिकच्या बॉटलदेखील गडावर नेण्यास बंदी घालण्याचा वनविभागाचा विचार आहे. सिंहगडावर नेहमी येणारे पर्यटक या निर्णयाचं स्वागत करत आहेत. वनविभागाच्या या निर्णयाचं सगळ्यांकडून स्वागत होत असलं तरी त्याची अंमलबजावणी कशी होते, हे महत्वाचं ठरणार आहे.