पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे आणि लेझर (Pune Ganeshotsav 2023) लाईट्सचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या लेझर लाईटमुळे अनेकांना कानाचा आणि डोळ्यांच्या त्रासाला सामोरं जावं लागलं आहे. पुण्यातील जनता वसाहत परिसरात राहणाऱ्या एका तरुणाच्या डोळ्याच्या रेटीनाला गंभीर इजा होऊन त्याच्या डोळ्याला काही अंशी अंधत्व आले आहे. लोखंड कापण्यासाठी किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरली जाणारी लेझर मिरवणुकीत  वापरण्यात आल्याचं डीजे व्यावसायिकांनी कबुल केलं आहे. 


अनिकेत (वय 23 रा. जनता वसाहत) असे काही अंशी अंध झालेल्या या तरुणाचे नाव आहे. अनिकेत मिरवणुकीच्या दिवशी पर्वती पायथा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. नाचत असताना डिजेवरील हिरवा लेजर लाईट त्याच्या एका डोळ्यावर पडला. यावेळी त्याला डोळ्याला काही वेदना किंवा आग झाली नाही मात्र याचा त्या डोळ्यावर चांगलाच परिणाम झाल आहे. त्याच्या एका डोळ्याची दृष्टी जवळपास 30 टक्क्याने कमी झाली आहे.


यानंतर अनिकेत सिंहगड रस्त्यावरील दूधभाते नेत्रालयात गेला. येथे त्याला नेत्ररोगतज्ञ डॉ. अनिल दूधभाते यांनी उपचार केले. याबाबत अधिक माहिती देताना डॉ. दूधभाते म्हणाले की, आमचे सेंटर अत्याधुनिक साधनांनी डोळ्याच्या सर्व प्रकारच्या उपचारासाठी सज्ज आहे. अनिकेतच्या डोळ्यावर लेजर लाईट पडल्याने त्याच्या नेत्रपटलावर रेटीनावर बर्न झाले आहे. आता त्याच्यावर उपचार सुरू असून तो बरा होत आहे.


अनंत चतुर्दशीला गणेशोत्सव मिरवणूक मोठ्या आनंदात पार पडली. आपल्या लाडक्या गणरायाला भक्तांनी आनंदात विसर्जित केलं. यामध्ये ढोल ताशासह आता सध्या डीजेचा ट्रेंड पडला आहे.  याच्या  गजरात नाचत, थिरकत गणपती बाप्पा ला निरोप दिला गेला! पण, यामध्ये झालेला लेजर लाईटचा वापर हा तरुणांच्या डोळ्यांना घातक ठरत आहे. त्यामुळे अनेकांना असह्य वेदना सहन कराव्या लागत आहे. 


काय आहे लेझर बर्न?


या हिरव्या लेझर लाईटची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते. जे युवक त्या लेझर फ्रिक्वेन्सीच्या 'फोकल लेंग्थ' वर आले किंवा त्यांचे नेत्रपटल आले तर या त्रासाला सामोरे जावे लागते. आपण लहानपणी भिंग घेऊन ज्या प्रमाणे उन्हात कागद पेटवायचो तसाच हा प्रकार आहे. अनिकेत सारखे अनेक रुग्ण असतील तर त्यांनी तातडीने नेत्ररोग तज्ञाला दाखवावे. या सगळ्या तरुणांना झालेला नेत्रपटल दोष त्यांच्या शिक्षणावर आणि करीअरसाठी किती भयावह असेल याची कल्पना करवत नाही. त्यासाठी हा लेझर लाईट टाळावा. या लेझर वापरावर बंदी आणण्याची गरज आहे. नाही तर याचे भयंकर परिणाम पुढील नवरात्र आणि दिवाळीतही दिसतील,असं डॉक्टर सांगतात.


लोखंड कापण्यासाठी किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरली जाणारी लेझर मिरवणुकीत....


युद्ध, आग किंवा इमर्जन्सी सिच्यूएशनमध्ये लोकांना संदेश देण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणं मोठ्या आवाजासाठी मिरवणुकांमध्ये वापरली जाऊ लागलीत . तर लोखंड कापण्यासाठी किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरली जाणारी लेझर बीम मिरवणुकांमध्ये वापरली जातायत . पुण्यातील डी जे व्यवसायिकांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनीच याची कबुली दिली आहे.


हेही वाचा-


Pune Ganesh visarjan Noise Pollution : बापरे नुसत्याच कानठळ्या! मागील 20 वर्षात यंदा सर्वाधिक आवाजाची पातळी, कशी मोजली जाते आवाजाची पातळी?