पुणे : पुण्यात रोज नवनव्या घटना समोर येत असतात. त्यात (Pune Crime news) छेडाछेडीच्या घटनादेखील समोर येत असतात. त्यातच पुण्यात अनेक कंपन्या आहेत, कॉलेज आहेत याठिकाणी होत असलेल्या विनयभंगाच्या तक्रारी समोर येतात. कधी बॉसकडून तर कधी काम करत असलेल्या ठिकाणच्या मालकाकडून घाणेरड्या नजरा अनेकदा महिला कर्मचाऱ्यांना झेलाव्या लागतात. असाच एक संतापजनक प्रकार पुण्यातील एका ट्रेनिंग सेंटरमधून समोर आला आहे. डीप नेक आणि शॉर्ट ड्रेसमध्ये यायचं, अशी भलतीच अट ट्रेनिंग सेंटरच्या मालकाने घातल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी मालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार 8 मे ते 14 मे या कालावधीत कोथरूड येथील गामाका एआयआयटी ट्रेनिंग सेंटर येथे घडला. याबाबत निगडी परिसरातील एका हॉस्टेलवर राहणाऱ्या 27वर्षीय तरुणीने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून महेश गंगाधर कनेरी (51, रा. लोट्स लक्ष्मी, विकासनगर, वाकड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी कनेरी याचे कोथरूड येथे गामाका एआयआयटी ट्रेनिंग सेंटर आहे. या ट्रेनिंग सेंटरमध्ये पीडित तरुणी नोकरी करते. मंगळवारी (दि. 14 ) फिर्यादी कामावर आल्या असता, आरोपीने अशा कपड्यांमध्ये का आलीस, आपल्या संस्थेमध्ये कामावर येताना डीप नेक आणि शॉर्ट ड्रेस घालून यायचे असते तुला माहीत नाही का? तसेच माझ्यासोबत बिझनेस मीटिंगसाठी हॉटेलमध्ये येशील का? दुसऱ्या मुली माझ्यासोबत येतात, पैशाची काही कमी पडणार नाही, असे म्हणत करिअर बाद करण्याची धमकीदेखील दिली.
पुण्यात महिला असुरक्षित?
पुण्यात मागील काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे शिक्षणाच्या माहेरघरात महिलाच असुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दर्शना पवार हत्या प्रकरण आणि त्यानंतर सदाशिव पेठेत भर रस्त्यात प्रेमातून कोयत्याने केलेल्या हल्ल्याने महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर महिलांवरील हल्ले आणि या सगळ्या घटना रोखण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र घटनांची संख्या कमी होताना दिसत नाही आहे. यातच पुन्हा एकदा हल्ला झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
इतर महत्वाची बातमी-
बंगळुरूत 'यलो अलर्ट'; संपूर्ण आठवडाभर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईतील परिस्थिती काय?