पुणे : नाशिक फाटा ते राजगुरुनगर (खेड) या 30 किलोमीटर लांबीच्या पुणे-नाशिक महामार्गाचे उन्नतीकरण होणार आहे. या प्रकल्पामुळे सध्या दीड ते दोन तास लागणारा प्रवास अवघ्या 30 मिनिटांत पूर्ण होईल. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, 25 सप्टेंबर रोजी निविदा खुल्या करण्यात येणार आहेत. या कामासाठी सुमारे १४ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. प्रस्तावित मार्गिका प्रामुख्याने ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत येते. मुख्यमंत्री स्तरावर झालेल्या बैठकीत ऑक्टोबरपूर्वी भूसंपादन पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, 80 टक्के भूसंपादन पूर्ण झाल्याशिवाय प्रत्यक्ष काम सुरू करता येणार नाही, असे एनएचएआयने स्पष्ट केले आहे.

Continues below advertisement


या प्रकल्पाचा उद्देश शहरी वाहतूक कोंडी कमी करणे हा आहे. विद्यमान पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण आणि उन्नत मार्गिका बांधकाम यात समाविष्ट आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी या प्रकल्पासाठी 7827 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चाकण एमआयडीसीशी जोडणाऱ्या महामार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल, अशी अपेक्षा आहे. पीएमआरडीए क्षेत्रातील 150 जमीनमालकांकडून सुमारे 9.74 हेक्टर जमीन संपादित होणार आहे. ही जमीन नाणेकरवडी, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, चिंबळी, कुरुळी, मेदनकरवाडी आणि चाकण परिसरातील आहे. भूसंपादन प्रक्रिया गतीमान करण्यासाठी हस्तांतरण विकास हक्क (टीडीआर) किंवा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय)चा वापर केला जाणार आहे.


पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील भोसरी आणि मोशी भागातही भूसंपादनाची आवश्यकता आहे. महापालिकेने बहुतांश जमीन टीडीआर आणि एफएसआयच्या बदल्यात आधीच संपादित केली आहे. उर्वरित जमीन संपादित करण्यासाठी राज्य सरकारकडे निधी मागण्यात आल्याचे सांगण्यात आले. या मार्गिकेसाठी एकूण 10 प्रवेश आणि निर्गमनमार्ग असतील. प्रकल्पाची लांबी 30 किलोमीटर असून, एकूण 14 हेक्टर जमिनीचे संपादन आवश्यक आहे. 25 सप्टेंबर ही निविदा प्रक्रियेची अंतिम मुदत ठरविण्यात आली आहे. या उन्नत मार्गिका प्रकल्पासोबतच बालेवाडी ते शेडगे वस्ती, सूर्या हॉस्पिटल ते ठाकर वस्ती आणि नांदे-माण रोड यांसारखी रस्ते विस्ताराची कामे सुरू आहेत. त्याचबरोबर बहुप्रतिक्षित पुणे वर्तुळाकार रस्त्याचे कामही टप्प्याटप्प्याने होत आहे. या सर्व प्रकल्पांमुळे शहरी गतिशीलता सुधारेल आणि औद्योगिक तसेच निवासी विकासाला चालना मिळेल.


प्रकल्पाचा आढावा
मार्गिका प्रस्तावित गावे – एकूण सात
एकूण लांबी 30 किलोमीटर
प्रवेश मार्गिका – 10 आगमन आणि निर्गमनमार्ग असतील
अपेक्षित भूसंपादन – 14 हेक्टर
अपेक्षित खर्च – 7827 कोटी रुपये
निविदा प्रक्रियेची अंतिम मुदत – 25 सप्टेंबर