ना आवडीचा बाप्पा, ना आवडीचा प्रसाद, ना तक्रार... फक्त सुखी ठेव, हीच एक मागणी!प्रत्येकासाठी बाप्पा वेगळा असतो. श्रीमंतांचा गणाधीश, गरिबांचा विघ्नहर्ता, कलाकारांचा कलाधिपती... बाप्पाची ही वेगवेगळी नावं वेगवेगळ्या लोकांसाठी तयार झाली असावीत, नाही का?
गणपती कव्हर करताना प्रत्येकाचा बाप्पा किती वेगळा असतो हे अनुभवतेय. VIP एंट्रीपासून ते तासनतास रांगेत उभं राहणाऱ्या भक्तांपर्यंत सगळं बघतेय. पण सगळ्यात वेगळा बाप्पा अनुभवला तो सिंधूताई सपकाळ यांच्या बालसंगोपन केंद्रात...
"यंदा आरतीला यायचंय बरं का पोरे..." असा सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता ताईंचा फोन आला. काहीही झालं तरी यावेळी नक्की येणार!" सांगितलं आणि गेले.
रोज शाही मंडळं कव्हर करणारी, जल्लोष बघणारी, रॉयल मिरवणुका बघणारी आणि रोज कामाच्या निमित्ताने का होईना,वेगवेगळ्या मंडळांतील बाप्पाचं दर्शन घेणारी मी... या ठिकाणी जाऊन मात्र शांत झाले. कारण रोज अनुभवणाऱ्या गणेशोत्सव आणि इथे पाहिलेल्या गणेशोत्सवात जमीन-अस्मानाचा फरक होता. गेल्यावर मुलं आरतीची तयारी करून थांबलेली. पाहिलं तर प्रत्येकाच्या हातात आरती लिहिलेल्या पानांची झेरॉक्स होती. काहींच्या हातात टाळ, काहीजण शांतपणे बाप्पाकडे बघत होते, तर काही आज प्रसाद काय आहे हे पाहत होते. मुलांचं वय – अगदी बाप्पा मिरवायचं वय! धांगडधिंगा, धिंगाणा करण्याचं वय! पहिली ते आठवीपर्यंतची पोरं.
"शांत व्हा... आरती करूया!"ताईंचा एक आवाज निघाला.
हा आवाज ऐकून, बाप्पाजवळ काहीही न मागता, थेट सुखकर्ता... दुःखहर्ता... या आरतीला सुरुवात झाली.
कोणी जोराने, तर कोणी थोडंसं तुटक-फुटक वाचत होतं, पण सगळे एकमेकांच्या तालात टाळ वाजवत होते. चार-पाच ओळींची आरती सुरू असताना, मी मुलांकडे पाहत होते. अगदी देवाकडे कोणतीही इच्छा न मागता, फक्त मज्जा म्हणून टाळ्या वाजवत होते.
आपल्याकडे जगातली सगळ्यात मोठी गोष्ट – माय-बाप – नाहीत हे त्यांनी स्वीकारलंय. आणि उलटपक्षी, जे आहे, त्यालाच आपलं मानून त्यातून काय करता येईल, कशी मजा करता येईल, हे शोधत होते.
ना मनात दुःख, ना कोणाकडून अपेक्षा, ना कुणाचा हेवा... आहे ते सुंदर पद्धतीने स्वीकारून ही मुलं जगताना दिसत होती.
मी हातात आरती घेतली. समोर सगळ्यांचा लाडका बाप्पा, आणि मागे जोरजोरात आरती म्हणणारी मुलं. दोघांच्यामध्ये मी. आरती पुटपुटत होते... कारण ती आरती मोठ्याने म्हणायची हिंमत होत नव्हती.
डोळ्यासमोर बाप्पा असला तरी या मुलांच्या मनात असलेली सकारात्मकता, आनंद, आणि समाधान मला आतून हलवून गेलं.आरती करताना हात थरथरले... डोळे भरून आले... दोन मिनिटांची ती आरती, आयुष्य काय असतं हे शिकवून गेली.
आपल्याकडे सगळं आहे – सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपले आई-वडील आहेत. हातपाय व्यवस्थित आहेत. पैसा आहे. आवडतं काम, आवडत्या गोष्टी करायची मुभा आहे. बाप्पा आपल्या इच्छा पूर्ण करतो. कपडेलत्ते, ऐशआराम... सगळं काही दिलंय देवाने. ...पण तरीही आपण तक्रारी करतोच. रोज नवी तक्रार उभी असते. या लहानग्यांकडे काहीही नसूनही स्वच्छंदी जगण्याची कला आहे. आपण एकटे नाही, याची त्यांना जाणीव आहे. धैर्य आहे, हिंमत आहे. जगातल्या अनेक गोष्टी ज्यांच्याकडे आहेत, त्यातल्या निम्म्याही गोष्टी या मुलांकडे नाहीत – तरीही कोणती तक्रार नाही.
त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. सिंधूताईंनंतर ममता ताई नावाप्रमाणेच ममतेने हा आश्रम चालवत आहेत. 90 मुलांची जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यावर. या मुलांना सांभाळणं आणि त्यांना जगासमोर आत्मविश्वासानं उभं करणं हे त्या करत आहेत. शिक्षणासोबतच जीवनाचं शिक्षण त्या मुलांना देत आहेत. हे काम असंच चालू राहो.
इथून फोटो, व्हिडीओ काढून बाहेर पडल्यानंतर मन मात्र जड झालं. "आपल्याकडे सगळं असूनही आपण का तक्रार करतो?" हा प्रश्न पडला. मात्र या प्रश्नाचं उत्तर अजूनही सापडलेलं नाही... कदाचित कधीच मिळणार नाही... पण या मुलांकडे पाहून मात्र एक उत्तर मिळालं.. प्रत्येकाचा बाप्पा वेगळा असतो.म्हणूनच त्याला इतकी नावं आहेत.