Pune Nashik Highway Accident: पुणे : पुणे (Pune News) पोर्शे अपघातानंतर आणखी एक भीषण अपघात (Accident News) पुण्यात झाला आहे. पुणे पोर्शे प्रकरणाप्रमाणेच पुण्यातील पुणे-नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway Accident) झालेल्या अपघाततही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचं कनेक्शन समोर आलं आहे. पुण्याती खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांचा पुतण्या मयूर मोहिते (Mayur Mohite) यानं अत्यंत बेदरकारपणे कार चालवत दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांना चिरडलं. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी मयूर मोहितेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


आमदार पुतण्या अपघातानंतर तिथून निघून गेला, त्यानं अपघातग्रस्तांना कोणतीही मदत केलेली नाही. तसेच, अपघातावेळी त्यांनी मद्यप्राशन केलं होतं, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच, स्थानिकांनी केलेले सर्व आरोप मयूरच्या आमदार असलेल्या काकांनी फेटाळून लावले आहेत. जे घडलंय ते चुकीचंच आहे, पण मयूर इंजिनिअर आणि उद्योजक आहे, अपघातावेळी तो पळून गेला आणि तर त्यानं दारूही प्यायलेली नव्हती, असा दावा खेड तालुक्याचे आमदार मोहिते पाटलांनी केला आहे. दरम्यान, एबीपी माझानं अपघातस्थळी जाऊन प्रत्यक्षदर्शींसोबतही बातचित केली. त्यावेळी प्रत्यक्षदर्शींनी काय म्हटलं? जाणून घेऊयात सविस्तर... 


एबीपी माझानं अपघात झाला त्यावेळी अपघातस्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींसोबत बातचित केली. त्यावेळी पुणे-नाशिक महामार्गावरील अपघातानंतर आमदाराचा पुतण्या मयूर मोहितेनं तातडीनं मदत केली असती, तर आज ओम भालेराव बचावला असता, असं अपघातस्थळी उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. मयुरचं नेमकं काय चुकलं? हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. 


प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काय सांगितलं? 


"ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी त्या दुचाकीच्या केवळ दीडशे ते दोनशे फूट माझी गाडी मागे होती. आमच्या पुढे दुचाकी होती, ज्यावेळी समोरुन आलेली व्हाईट कार विरुद्ध दिशेनं ओव्हरटेक करण्यासाठी निघाली, त्याचवेळी आमच्या लक्षात आलं की, आता काहीतरी मोठी दुर्घटना घडणार आहे. जर ओम भालेरावची दुचाकी नसती, तर व्हाईट गाडी माझ्याच गाडीवर येऊन आदळली असती. अपघात झाल्यानंतर अपघात झालेल्या व्यक्तीला मदत मिळावी म्हणून मी तात्काळ गाडी बाजूला घेऊन गाडीतून बाहेर उतरलो. ज्या व्यक्तीनं ओमच्या गाडीला धडक दिली होती, त्याला मी सांगितलं की, गाडीतून बाहेर येऊन त्याला रुग्णालयात घेऊन चला. त्यावेळी मयूर मोहितेनं मला उत्तर दिलं की, गाडीचा दरवाजा उघडत नाही. मी स्वतः गाडीचा दरवाजा उघडला, त्याला आणि त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती गाडीत होती, दोघांनाही बाहेर यायला सांगितलं. तोपर्यंत आणखी काही लोक इथे जमा झाली होती. आम्ही तात्काळ ओमकडे गेलो, सर्वांनी रुमाल त्याच्या डोक्याला बांधले पण तरिदेखील रक्तस्राव काही थांबण्याचं नाव घेत नव्हता. आम्ही सातत्यानं मयूरला त्या तरुणाला रुग्णालयात घेऊन चलण्यासाठी विनवण्या करत होतो, पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. अॅम्ब्युलन्स येण्यासाठी फार वेळ लागला. अॅम्ब्युलन्स आल्यानंतर त्या तरुणाला अॅम्ब्युलन्समध्ये घातलं आणि तात्काळ रुग्णालयात हलवलं.", असं प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. 


आमदाराच्या पुतण्यानं जर चूक ओळखून वेळीच अपघातग्रस्त तरुणाला मदत केली असती, तर कदाचित आताचं चित्र काहीसं वेगळं असतं. अपघाता जो ओम भालेराव मृत्यू पावला त्याला जर मयूर मोहितेनं वेळीच अॅम्ब्युलन्सची वाट न पाहाता आपल्या गाडीतून रुग्णालयात तातडीनं दाखल केलं असतं तर कदाचित आज त्याचा जीव वाचला असता, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. 


अपघात कसा घडला? 


पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यानं बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना आपल्या गाडीनं चिरडलं. या घटनेत ओम भालेराव (वय 19 वर्ष) तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयुर हा पुणे-नाशिक महामार्गावरून कारनं पुण्याच्या दिशेनं येत होता. तो विरुद्ध दिशेनं सुसाट गाडी चालवत होता. त्यावेळी समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना त्याच्या भरधाव कारनं धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकी हवेत उडाली आणि दुचाकीवरील तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. यापैकी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे ओम भालेराव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सखोल तपास सुरू आहे. 


आमदारांचा पुतण्या मयूर मोहिते नेमका कोण? 


पुणे नाशिक महामार्गावर कळंब नजिक झालेल्या अपघात प्रकरणात खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर मोहितेनं भरधाव कार चालवत दोघांना चिरडल्याची घटना पुणे नाशिक महामार्गावर घडली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेतील मुख्य आरोपी मयूर मोहिते हा पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे सख्खे बंधू साहेबराव मोहितेंचा मयूर मोहिते पाटील मुलगा आहे. आमदार मोहितेंच्या पाठोपाठ पुतण्या मयूर सर्व राजकीय धुरा सांभाळतो. तो इंजिनिअर असून सध्या कुटुंबाचा व्यावसाय सांभाळतो. तसेच, मयूर सध्या जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्याची तयारी करत असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. 


पाहा व्हिडीओ : Pune Nashik Highway Accident : आमदाराच्या पुतण्याने बाईकस्वाराला चिरडलं,अपघात नेमका कसा घडला?