Pune Nashik Highway Accident: पुणे : पुणे पोर्शे अपघातानंतर (Pune Porshe Accident) आणखी एका भीषण अपघातानं (Pune Nashik Highway Accident) पुणे (Pune News) हादरलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एका आमदाराच्या पुतण्यानं आपल्या गाडीनं दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांना उडवल्याचा प्रकार घडला. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आमदाराचा पुतण्या अपघातानंतर तिथून निघून गेला, त्यानं अपघातग्रस्तांना कोणतीही मदत केलेली नाही. तसेच, अपघातावेळी त्यानं मद्यप्राशन केलं होतं, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. 


पुणे-नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) कळंबमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचालकानं दोघांना चिरडलं असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या (Dilip Mohite Patil) पुतण्याकडून हा अपघात झाला आहे. या प्रकरणी मोहिते पाटलांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार दिलीप मोहिते पाटलांचा पुतण्या कार चालवताना दारुच्या नशेत होतो, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. 


माझा पुतण्या पळून गेला नाही, तो दारूही प्यायलेला नव्हता : आमदार दिलीप मोहिते पाटील 


आमदाराचा पुतण्या अपघातानंतर तिथून निघून गेला, त्यानं अपघातग्रस्तांना कोणतीही मदत केलेली नाही. तसेच, अपघातावेळी त्यांनी मद्यप्राशन केलं होतं. त्यावर बोलताना दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, "माझा पुतण्या अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस अजूनही चौकशी करतील, पोलिसांनी माझ्या पुतण्याचे वैद्यकीय तपासणीसाठी सॅम्पल्स घेतलेले आहेत. अपघातग्रस्त तरुणाला माझ्या पुतण्यानं अॅम्बुलन्समध्ये टाकलं आहे. त्यामुळे इतर आरोपांत मला तथ्य वाटत नाही. पण मी अपघातस्थळी नव्हतो. त्यामुळे यासर्व घडामोडींची मी नक्कीच शहानिशा करीन." 


दोघांना आपल्या वेगवान कारनं चिरडणारा पुण्याच्या आमदारांचा पुतण्या मयूर मोहिते नेमका कोण? 


पुणे नाशिक महामार्गावर कळंब नजिक झालेल्या अपघात प्रकरणात खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर मोहितेनं भरधाव कार चालवत दोघांना चिरडल्याची घटना पुणे नाशिक महामार्गावर घडली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेतील मुख्य आरोपी मयूर मोहिते हा पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे सख्खे बंधू साहेबराव मोहितेंचा मयूर मोहिते पाटील मुलगा आहे. आमदार मोहितेंच्या पाठोपाठ पुतण्या मयूर सर्व राजकीय धुरा सांभाळतो. तो इंजिनिअर असून सध्या कुटुंबाचा व्यावसाय सांभाळतो. तसेच, मयूर सध्या जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्याची तयारी करत असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. 


नेमका कसा घडला अपघात? 


पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यानं बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना आपल्या गाडीनं चिरडलं. या घटनेत ओम भालेराव (वय 19 वर्ष) तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयुर हा पुणे-नाशिक महामार्गावरून कारनं पुण्याच्या दिशेनं येत होता. तो विरुद्ध दिशेनं सुसाट गाडी चालवत होता. त्यावेळी समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना त्याच्या भरधाव कारनं धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकी हवेत उडाली आणि दुचाकीवरील तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. यापैकी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे ओम भालेराव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सखोल तपास सुरू आहे. 


पाहा व्हिडीओ : Dilip Mohite Patil:अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नाही,त्याने मद्यपान ही केलं नव्हतं



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pune Accident: पुण्यात भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं, नेमकं काय घडलं?


माझा पुतण्या पळून गेला नाही, त्यानं मद्यप्राशनही केलेलं नव्हतं; पुतण्याच्या अपघातानंतर आमदार मोहिते पाटलांचा दावा