पुणे : पुण्यातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या कुमारी मातेला प्रसुती कळा सुरु झाल्या. मात्र महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयानं तिची प्रसुती करण्यास नकार दिला. अखेर एका खाजगी रुग्णालयात तरुणीने बाळाला जन्म दिला.
डॉक्टर कुलदीप वाघ आणि डॉक्टर राधिका वाघ यांच्या ब्लोझम वुमन केअर सेंटरमध्ये तरुणीची प्रसुती झाली. तरुणीनं एका मुलाला जन्म दिला.
एकीकडे कुमारी मातांना कुटुंब, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींकडून स्वीकारलं जात नाही. त्यातच रुग्णालयांनी प्रसुतीला नकार दिल्यामुळे त्यांची मोठी अडचण होते.
दुसरीकडे, कुमारी मातांच्या प्रसुतीनंतर डॉक्टरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी तरुणी बाळाला सोडून निघून जाण्याची शक्यता जास्त असते. प्रसुतीदरम्यान बाळ किंवा आईच्या प्रकृतीची जबाबदारीही डॉक्टरांवर येते. कुमारी मातेचं प्रकरण पोलिस आणि न्यायालयातही पोहचत असल्याने प्रसुती करणारे डॉक्टरही या फेऱ्यात येतात.
महाविद्यालयीन तरुणींमध्ये कुमारी मातांचं प्रमाण वाढल्याचं वाघ दाम्पत्याने सांगितलं. अनेकवेळा मासिक पाळी चुकल्यानंतरही तरुणी त्याकडे दुर्लक्ष करतात . गर्भ वीस आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा झाल्यास गर्भपात करण्यास कायद्यानी बंदी आहे. त्यामुळे कुमारी मातांचं प्रमाण वाढत असल्याच डॉक्टरांनी सांगितलं.
या संदर्भात महाविद्यालय आणि शाळांमध्ये तरुणींना मार्गदर्शन करुन समाजाचा दृष्टीकोनही बदलण्याचे प्रयत्न करणार असल्याचं डॉक्टर वाघ यांनी सांगितलं.