पुणे : पुणे महापालिकेने चार कोविड केअर सेंटर आणि नऊ विलगीकरण कक्ष तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसात पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटल्याने हा निर्णय घेतल्याचं महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितलं.


पुणे शहरात महापालिकेच्या वतीने 11 कोविड केअर सेंटर आणि 16 विलगीकरण कक्ष चालवले जातात. आता 11 पैकी 4 कोविड केअर सेंटर आणि 16 विलगीकरण कक्षापैकी 9 कक्ष बंद केले जाणार आहेत. त्यामुळे शहरात सध्या प्रत्येकी 7 कोविड सेंटर आणि विलगीकरण कक्ष सुरु राहतील.


मागील काही दिवसांपासून पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्येत घट पाहायला मिळत आहे. त्यामुळे रुग्णालयातील काही बेड रिकामे आहेत. त्यामुळे कोविड केअर सेंटर चालवण्याचा खर्च, मनुष्यबळाचे व्यवस्थापन या सर्व गोष्टींचा विचार करुन महापालिकेने चार कोविड केअर सेंटर आणि नऊ विलगीकरण कक्ष तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


दरम्यान पुण्यात 20 ठिकाणी कोविड केअर सेंटर प्रस्तावित आहेत. तर शिवाजीनगर आणि बाणेर येथे जम्बो कोविड रुग्णालयंही उभारण्यात आली आहेत.


पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 1 लाख 54 हजार 581 वर पोहोचला आहे. त्यापैकी 1 लाख 38 हजार 452 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात सध्या 12 हजार 285 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी 856 जणांची परिस्थिती गंभीर आहे. त्यामधील 456 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.


दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या अभावी अहमदनगर महापालिकेनेही आपले सर्व कोविड केअर सेंटर बंद केले आहेत. शहरात खासगी रुग्णालयाव्यतिरिक्त नटराज हॉटेल, जैन पितळे बोर्डिंग, बूथ हॉस्पिटल आणि कर्मयोगी सेंटर इथेच कोविड सेंटर सुरु आहेत.


Pune Coronavirus Update | पुण्यातील 4 कोविड सेंटर्स, 9 विलगीकरण कक्ष बंद होणार; पुणे मनपाचा निर्णय