MPSC Pune Protest : मागील चार वर्षांपासून मी एमपीएससीचा अभ्यास करत आहे. त्यात माझं लग्नाचं वय उलटून जात आहे. त्यामुळे कुटुंबियांकडून आता मुलं बघायला सुरुवात झाली आहे. एकीकडे अभ्यास आणि दुसरीकडे लग्न दोन्ही आयुष्यातील महत्वाचे टप्पे आहेत. दोन्ही गोष्टींचा समतोल राखून मानसिकदृष्ट्या स्वत:ला खंबीर ठेवणं फार कठीण जात आहे, असं एमपीएससीचा अभ्यास करणारी साताऱ्याची स्नेहल मोरे सांगते. 


साताऱ्याची स्नेहल मोरे सकाळी साडे नऊवाजेपासून रात्री 10 पर्यंत आंदोलनात बसून होती. मागण्या मान्य होतील आणि अभ्यासाचा असलेला संभ्रम दूर होईल या अपेक्षेने ती आणि तिच्यासारख्या अनेक मुली या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्रात साधारण वयाच्या पंचवीशीत मुलींचं लग्न केलं जातं. त्यात वय वाढत गेलं तर कुटुंबियांकडून त्यांच्यावर लग्नासाठी दबाव टाकला जातो. एमपीएससीचा अभ्यास करण्याऱ्या अनेक मुलींवर कुटुंबियांकडून लग्नासाठी दबाव टाकला जात असल्याचं या आंदोलनातून समोर आलं. 


एमपीएसी परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. सलग 10 ते 11 तास विद्यार्थ्यांनी पुण्याच्या अलका टॉकीज चौकात ठिय्या मांडला होता. यात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांच्यासोबत अनेक विद्यार्थीनीदेखील होत्या. अनेक विद्यार्थी सलग चार वर्षांपासून परिक्षेचा अभ्यास करत आहेत तर अनेक विद्यार्थ्यांनी काही महिन्यांपूर्वीच अभ्यासाला सुरुवात केली आहे. एकीकडे अभ्यास, दुसरीकडे वाढत असलेलं वय आणि तिसरं म्हणजे कुटुंबियांकडून असलेलं लग्नासाठीचं प्रेशर या तिनही गोष्टींमुळे अनेक विद्यार्थीनी त्रस्त आहेत. 


'कधीपर्यंत एमपीएससीचा अभ्यास करणार लग्नाचं बघा'


साताऱ्याची स्नेहल मोरे हिने एबीपी माझाशी बोलताना तिच्या आयुष्यात सुरु असलेल्या सध्याच्या घटनांबाबत सांगितलं. ती म्हणते, मी मागील चार वर्ष झाले एमपीएससीचा अभ्यास करते आहे. पहिले दोन वर्ष मी य़ुपीएससीचा अभ्यास केला मात्र त्यात फार अभ्यास असल्याने आणि माझी कुवत मला माहित असल्याने मी एमपीएससीच्या अभ्यासाकडे वळले. त्यानंतर एमपीएससीचा अभ्यास करताना माझं वयही वाढत आहे. साधारण ग्रॅज्यूएशन केल्यानंतर चार वर्ष जर एमपीएससीचा अभ्यास करत असू तर तुम्हाला तुमच्या वाढत्या वयाचंदेखील भान ठेवणं गरजेचं आहे. वय वाढणं थांबत नाही त्यामुळे कुटुंबियांकडूनही लग्नाचा विचार होतो. एकीकडे अभ्यास आणि दुसरीकडे कुटुंबियांकडून लग्नासाठीच नाही तर अनेक गोष्टींसाठी ताण दिला जातो. त्यामुळे अभ्यासासोबतच मानसिकदृष्ट्याही सक्षम राहणं कठीण जातं. त्याचवेळी तुम्हाला सामाजिक ताणदेखील येतो. तुमचे मित्र मंडळी खूप चांगल्या ठिकाणी नौकरी करत असतात. त्यांनी एखाद्या क्षेत्रास प्रावीण्या प्राप्त केलं असतं आणि वय वाढत असताना तुमच्या हातात काहीही नसतं. त्यावेळी मानसिक ताण येतो. आयुष्याच्या शर्यतीत मागे पडत असल्याचं प्रत्येक क्षणाला जाणवत असतं. त्याच वेळी नातेवाईकांकडून खास प्रश्न विचारला जातो त्या प्रश्नाचं उत्तर देणं फार कठीण जातं तो प्रश्न म्हणजे कधीपर्यंत एमपीएससीचा अभ्यास करणार लग्नाचं बघा आता... या प्रश्नाचं उत्तर कुटुंबियांनादेखील विचारला जातो. त्यामुळे हे सगळं मानसिक त्रास सहन करत अभ्यास करत आहोत. त्यात जर अचानक नियम बदलत असेल तर मुलींसाठी हे त्रासदायक ठरु शकते. 


... तर मुलींना त्यांंच्या स्वप्नांवर पाणी सोडावं लागणार


दोन वर्षांपूर्वीच लग्न झालेली आरती दिगोळे म्हणते, मी नाशिक जिल्ह्यातील एका लहान गावातून पुण्यात अभ्यासासाठी आले आहे. यापूर्वीदेखील अभ्यास करायचे मात्र लग्न झालं की बाईचं आयुष्य बदलतं. सासर आणि माहेर दोन्ही कुटुंबियांच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. ग्रामीण भागातच सासर असल्याने सारसच्या मंडळींच्यादेखील माझ्याकडून संसाराच्या आणि करियरच्या अनेक अपेक्षा आहे. ग्रामीण परिसरातील मानसिकता आपल्यातील अनेकांना माहित आहे. मात्र सुदैवाने पतीचा संपूर्ण पाठिंबा असल्याने मी मोठ्या हिंमतीने स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. वय वाढलं की सासरकडच्या मंडळींकडून मुला-बाळांच्या अपेक्षादेखील वाढतात. या सगळ्यातून मार्ग काढून अभ्यास सुरु आहे. सगळा अभ्यास सुरु असतानाच असा परिक्षेच्या अभ्यासक्रमात बदल होत असल्याने अनेक मुलींना त्यांंच्या स्वप्नांवर पाणी सोडवं लागणार आहे.