पुणे : पिंपरी ते स्वारगेटपर्यंतच्या मेट्रोची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. (Pune Metro) मार्च 2024 पर्यंत पिंपरी ते स्वारगेटपर्यंत मेट्रो सुरु होण्याची शक्यता मेट्रो प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. पुणे मेट्रोने पहिल्या टप्प्यात PCMC आणि फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे कॉलेज या दरम्यान मेट्रो सुरु केली होती. 1 ऑगस्टपासून मेट्रोने आपली सेवा सिव्हिल कोर्टपर्यंत वाढवली आहे, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी आणखी वाढली आहे. याचाच पुढचा टप्पा हा स्वारगेट असणार आहे. मार्च 2024 मध्ये या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. या मार्गामुळे पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना थेट मार्ग उपलब्ध होईल आणि प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेची बचत होईल.
वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गाचे बांधकाम डिसेंबर अखेर पूर्ण होणार आहे. ज्यामुळे पुणेकरांना थेट वनाझ ते रामवाडी असा प्रवास करता येणार आहे. यानंतर मेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट मार्गावरील कामाला गती मिळणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काही मेट्रो मार्गांचं काम जलद गतीने सुरू केले आहे. त्यात पिंपरी ते सिव्हिल कोर्ट आणि वनाझ ते रुबी हॉल या मार्गांचा समावेश आहे. रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो स्टेशन आणि सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो स्टेशन पर्यंतच्या उर्वरित लाईनचे बांधकाम वेगाने सुरू आहे. रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो स्टेशन डिसेंबर 2023 च्या अखेरीस प्रवाशांच्या सेवेसाठी खुले होईल. शिवाय सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो स्टेशन मेट्रो स्टेशन मार्च 2024 च्या अखेरीस सुरू होईल, असं मेट्रो प्रशासनाने सांगितलं आहे.
पिंपरी निगडी मार्गाला केंद्र सरकारकडून हिरवा झेंडा
पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) इमारतीपासून निगडीपर्यंतच्या प्रस्तावित मार्गाला मंजुरी दिली आहे. काही दिवसांत केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय देखील मान्यता देईल असा अंदाज आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत या मार्गाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गाचा प्राथमिक प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आल्याचे महामेट्रोनं सांगितवं आहे. केंद्र सरकारने पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाला हिरवा झेंडा दाखवला. याच आनंदोत्सव पिंपरी मनसे कडून करण्यात आला होता. निगडी येथील भक्ती शक्ती चौकात एकमेकांना मिठाई भरवत जल्लोष करण्यात आला होता आमच्या मागणीला अखेर यश आल्याचा दावा यावेळी मनसेने केला होता.
इतर महत्वाची बातमी-