पुणे : राज्यातील 2359 नवनिर्वाचित सरपंचांवर (Gram Panchayat Election) मतदारांनी डोळे झाकून विश्वास टाकलाय, या विश्वासाला तडा जाऊ न देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. पुण्याच्या मावळमधील (Pune Maval Sate Gram Panchayat Election) सरपंच गणेश बोऱ्हाडेंचा (Ganesh Borhade) आदर्श या नवनिर्वाचित सरपंचांनी घेतला तर आणि तरच ते मतदारांचा हा विश्वास सार्थ ठरवू शकतात. "एक फोन कॉल, प्रॉब्लेम सॉल्व" गणेश बोऱ्हाडेंचा या संकल्पामुळे ते आदर्श सरपंच ठरले आहेत.
तुंबलेलं गटार स्वच्छ करणारे, रस्त्यावर धोका निर्माण करणारी खडी अन् झाडांच्या फांद्या हटवणारे, शाळेत विध्यार्थ्यांना मोकळा श्वास घेता यावा म्हणून स्वतःच्या डोक्यावर ओझी वाहणारे हे दुसरे-तिसरे कोणी नाहीत. तर पुण्याच्या मावळ तालुक्यातील साते ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश बोऱ्हाडे आहेत. ग्रामस्थांनी सरपंचांना फक्त एक फोन करायचा आणि पुढच्या क्षणाला हातातलं काम सोडून सरपंच बोऱ्हाडे थेट स्वतःच ती समस्या दूर करायला पोहचतात.
साते ग्रुप ग्रामपंचायत ही चार गावांमध्ये विस्तारलेली आहे, क्षेत्र पाच चौरस किलोमीटर इतकं आहे, पण ग्रामपंचायतीत केवळ दोन कर्मचारी. अशा परिस्थितीत गावकऱ्यांच्या समस्या खरंच सोडवायच्याच असतील तर सरपंच पदाच्या अविर्भावातून बाहेर पडणं हेच त्यावरचं एकमेव उत्तर होतं. तेच मी स्वीकारल्याचं बोऱ्हाडे सांगतात.
राज्यातील सर्व नवनियुक्त सरपंचांना अनुकरणीय
राज्यात 2959 गावांना नवनिर्वाचित सरपंच मिळालेत, या कारभाऱ्यांवर गावातल्या समस्या सोडविण्याची जबाबदारी आहे. यासाठी त्यांनी आदर्श सरपंच गणेश बोऱ्हाडेंची "एक फोन कॉल, प्रॉब्लेम सॉल्व" या संकल्पाचं अनुकरण करण्याची गरज आहे.
गावाला समस्येच्या गर्तेतून मुक्त करून, गावचा कायापालट मीच करेन असं सरपंच पदासाठी उभा असणारा प्रत्येक उमेदवार ग्रामस्थांना आमिष दाखवतो अन् तोच मतदार राजा या आमिषाला बळी पडतो, मतदार त्या उमेदवाराच्या पारड्यात आपलं मत टाकतो. पण एकदा का गावचा कारभार आपल्या हातात आला की तो रुबाब दाखवायला लागतो. मात्र गणेश बोऱ्हाडेंसारखे सरपंच त्याला अपवाद ठरतात. म्हणूनच ते आदर्श सरपंच म्हणून गणले जातात.
या संबंधित बातम्या वाचा: