अहमदनगर: विसाव्या वर्षापासून दरवेळी निवडणूक लढवली, पण प्रत्येक वेळी मतदारांनी आस्मान दाखवलं. पण थकला नाही, शेवटी 32 वर्षानंतर निवडणूक पठ्ठ्याने निवडणूक जिंकलीच आणि थेट सरपंच झाला. अहमदनगरच्या (Ahmednagar Election Result) अरणगावचे नूतन सरपंच पोपट पुंड (Popat Pund) यांना तब्बल 32 वर्षांनी सरपंच पद मिळाल आहे. त्यामुळे अवघ्या गावाने जल्लोष केला. 


अहमदनगरच्या अरणगावचे सरपंच पोपट पुंड यांनी वयाच्या 20 व्या वर्षी पहिली निवडणूक लढली होती, मात्र पदरी निराशाच पडली. त्यानंतर प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी नशीब आजमावलं. कधी ग्रामपंचायत तर कधी पंचायत समिती निवडणुका लढवल्या. पण तब्बल 32 वर्षे पदरी अपयश पडले. मात्र  आज वयाच्या 51 वर्षी त्यांचे निवडणुकीतील अपयशाचं ग्रहण सुटलं आणि ते सरपंचपदी निवडून आले. त्यानंतर मात्र कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.  


अरणगाव ग्रामपंचायतीत माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांच्या समर्थकांची सत्ता गेली अनेक वर्षे होती. तर पुंड हे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचे समर्थक आहेत.  त्यांनी वयाच्या 19-20 वर्षी गावचे सरपंच व्हायचे म्हणून स्वप्न पाहिले. मधल्या काळात त्यांनी 2002 ला पंचायत समिती तर 2014 ला सरपंच होण्यासाठी निवडणूक लढवली. पण त्यांना काही मतांनी पराभवाला सामोरे जावे लागत होते. सातत्याने पराभव पहावा लागत असला तरी त्यांनी जिद्द सोडली नव्हती. गावामधील लोकसेवेची कामे त्यांची सुरू होती, लोकांशी संपर्क कायम होता. 


एवढ्या वर्षांनी निवडून येण्याचं स्वप्न सत्यात उतरल्यानतंर पोपट पुंड हे अतिशय आनंदी आहेत. लोकांनी दिलेल्या जबाबदारीची जाणीव ठेऊन गावचा विकास करणे हेच ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 


कर्जतमध्ये रोहित पवारांना धक्का 


अहमदनगरच्या कर्जत-जामखेडमधील  9 ग्रामपंचायतींपैकी भाजपकडे 5, शरद पवार गटाकडे 2, अजित पवार गटाकडे एक आणि स्थानिक आघाडीकडे एक ग्रामपंचायत आली आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांना धक्का बसला आहे तर भाजप आमदार राम शिंदे यांचं वर्चस्व कायम राहिल्याचं चित्र आहे. 


भाजपला मिळालेल्या विजयानंतर आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश दिलं आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात गेल्या पाच वर्षात टप्प्याटप्प्याने सर्वाधिक ग्रामपंचायत भाजपकडे आल्या आहेत. मी गेल्या दहा वर्षात जो विकासाचा रथ या मतदारसंघात आणला त्यामुळे नागरिकांनी घवघवीत यश दिलं. बारामतीकर आले, बारामती करू म्हणाले आणि निवडणुकीच्या कालखंडात भानामती केली, भानामती करून मतदान घेतलं. मात्र गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात लोकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी जागा दाखवली.


ही बातमी वाचा: