पुणे : पुण्यात महिला सरपंचाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते मारहाण करत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. पुण्यातील कदमवाकवस्ती भागात लसीकरण केंद्रात ही घटना घडली होती. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून टीका होत आहे. मात्र या प्रकरणात आता ट्विस्ट आला आहे. पहिल्या व्हिडीओतून घटनेची एकच बाजू समोर आली होती. आता नव्या व्हिडीओमुळे या संपूर्ण प्रकरणाची दुसरी बाजू समोर आली आहे. 


पहिल्या व्हिडीओत सरपंच गौरी गायकवाड यांना राष्ट्रवादीचा कार्यकर्ता  सुजित काळभोरने मारहाण केल्याचं समोर आलं होतं. मात्र आता गौरी गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील सुजित काळभोरला मारहाण केल्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. 


सुजित काळभोरने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी तो लस घेण्यासाठी तेथे गेला होता. तेथे रांगेत उभा असताना अनेक जण रांगेशिवाय पुढे जाऊन लस घेत होते. ही बाब त्याला खटकली आणि त्याने याबाबत तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना जाब विचारला. मात्र यानंतर तेथे उपस्थित असलेल्या गौरी गायकवाड यांनी काहीही न विचारत थेट सुजितच्या कानशिलात लवागली. मला धक्काबुक्की करताना त्या स्वत: खाली पडल्या. त्यावेळी मी त्यांना हात देत उठवत होतो. मात्र हाच व्हिडीओ त्यांनी व्हायरल करत माझ्यावर मारहाणीचे आरोप केले असं सुजितने सांगितलं. 


मी महिलांचा आदर करतो. गौरीताई माझ्या बहिणीप्रमाणे आहेत. त्यामुळे माझ्यावर केलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी प्रकरणाची दुसरी बाजू पडताळून घ्यावी. चित्राताई वाघ या देखील येथे येऊन गेल्या. त्यांनी माझ्यावर अनेक आरोप केले. त्यामुळे आता पोलीस प्रशासनाने खरी बाजू समोर आणून मला न्याय द्यावा, अन्यथा मी अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं सुजितने म्हटलं आहे. 


कोणत्याही महिलेला मारहाण होणे निंदनीय आहे. अशाप्रकारे महिलांवर अत्याचार होत असेल तर कारवाई झालीच पाहिजे. सुजित काळभोर जरी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असला तरी महिलांची सुरक्षा आधी, मग पक्ष. जर सुजित दोषी असेल तर कारवाई होईल असं मी सांगितलं होतं. मात्र दोन्ही बाजू तपासणे गरजेचं आहे हे मी आधीची म्हटलं होतं. आता गौरी गायकवाड यांनी आधी मारहाण केल्याचं समोर आलं आहे. नव्या व्हिडीओतून काही गोष्टी स्पष्ट होत आहेत, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी म्हटलं. चित्रा वाघ