पुणे : शरद पवारांवर (Sharad Pawar) सातत्याने टीका करणाऱ्या नामदेव जाधवांविरोधात राष्ट्रवादी (NCP) शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नामदेव जाधव (Namdeo Jadhav) यांना काळं फासण्यात आलं. पुण्यातील येरवडा परिसरातील भांडारकर संस्थेच्या कार्यक्रमासाठी नामदेव जाधव पोहचले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यामुळे नामदेव जाधवांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.  


राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरु आहे. त्यातच प्राध्यापक नामदेव जाधव यांनी शरद पवार यांचा ओबीसी असा उल्लेख केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. नामदेव जाधव यांनी माध्यमांसमोर एक पत्र सादर करुन शरद पवार ओबीसी असल्याचा दावा केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी देखील नामदेव जाधवांना चांगलचं सुनावलं होतं. पण आता कार्यकर्ते देखील नामदेव जाधव यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. 


पुण्यात कार्यकर्ते आक्रमक


शरद पवारांविरोधात टीका करणाऱ्या नामदेव जाधवांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते पुण्यात आक्रमक झाले. दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील केली. नामदेव जाधव यांच्याविरोधात खंडणी घेतल्याचा आरोप करण्यात आला असून, अशा व्यक्तीने शरद पवारांविरोधात टीका करणं चुकीचं असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे नामदेव जाधव करत असलेले आरोप हे पूर्णपणे चुकीचे असल्याचं देखील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. 


जेव्हा हा संपूर्ण प्रकार घडणार होता तेव्हा पोलीस तिथे हजर नव्हते. पण काहीच वेळात पोलीस तिथे दाखल झाले. दरम्यान कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात नामदेव जाधव यांनी अद्यापही कोणती प्रतिक्रिया दिली नसल्याची माहिती देण्यात आलीये. 


नामदेव जाधवांच्या दाव्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदरा सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. हा संपूर्ण प्रकार हास्यास्पद असल्याचं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. आता या प्रकरणावर नामदेव जाधव काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच यावर पोलीस देखील कोणती करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. 


हेही वाचा : 


Prakash Ambedkar : मनोज जरांगेंना आव्हान देण्याची काय गरज होती? दोन समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू; प्रकाश आंबेडकरांची भुजबळांवर टीका