Dr. Ganesh Rakh : 2011 मध्ये सुनिता (नाव बदललेलं आहे) नावाची गरोदर महिला माझ्याकडे प्रसुतीसाठी आली होती. त्यांच्या कुटुंबीयांना मुलगाच हवा होता. मुलगा झाला नाही तर माझा छळ केला जाईल, असं सुनिता सांगत होती. त्यामुळे अगदी प्रसुतीच्या वेळी देखील सुनिताने आम्हा सगळ्यांना मुलगाच झाला पाहिजे, असं कडक शब्दांत सांगितलं. मात्र सुनिताला काही वेळातच कन्यारत्न प्राप्त झालं. तीन दिवसापर्यंत आम्ही सुनिताला मुलगी झाल्याचं सांगितलं नव्हतं. तिचं कुटुंब देखील नाराज होऊन दवाखान्यात सुनिताला भेटायला आलं नव्हतं. शिवाय तोपर्यंत कोणी तिच्या उपचाराचे पैसेही दिले नव्हते. तिच्या प्रसुतीच्या असह्य वेदना आणि तिचा मानसिक त्रास पाहता आम्हीच तिच्या लेकीचं सेलेब्रेशन केलं. मी डॉक्टर मामा झालो तर आमच्यातील काही नर्स आजी, मावशी झालो आणि दवाखान्यातच तिला कुटुंब असल्याचं भासवण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी मुलगी होणं लोकांसाठी इतकं त्रासदायक का असू शकतं? असा प्रश्न मला पडला, त्याचवेळी लेक झाली तर बिल न घ्यायचा असा निर्णय मी घेतला, असं (Doctor) डॉ. गणेश राख यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
डॉ. गणेश राख पुण्यातील हडपसरमध्ये एक प्रसुती आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालवतात. त्याच्या हॉस्पिटलमध्ये मुलगी जन्माला आल्यास बिल माफ केलं जातं. या सगळ्याचा उद्देश स्त्री भ्रूणहत्येबद्दल जनजागृती करणं आहे. 2011 पासून त्यांनी आजपर्यंत (8 नोव्हेंबर) मोफत प्रसुती करुन 2430 मुलींना सुखरुप या जगात आणल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या हडपसर परिसरातील हॉस्पिटलमध्ये 2011 पासून हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला त्यांनी ‘बेटी बचाओ जनआंदोलन’ असं नाव दिलं आहे. त्यांच्या या उपक्रमाचं अनेक स्तरावरुन कौतुक केलं जात आहे. सामाजिक कार्य करण्यासाठी मी डॉक्टर झालो नव्हतो, मात्र परिस्थिती आणि मुलगी नकोशी असलेली लोकांच्या मनातील कडवट भावना पाहून मला पैसे नाही तर ती भावना बदलण्याची गरज असल्याचं भासलं आणि त्यातून मुलींंच्या जन्मासाठी हे जनआंदोलन सुरु झालं, असं ते सांगतात.
मुलगी जन्माला आली की हॉस्पिटलमध्ये मोठं सेलिब्रेशन
डॉ. गणेश राख यांच्या हॉस्पिटलमध्ये ज्यादिवशी मुलगी जन्माला येते त्याच दिवशी हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी एकत्र येत मोठं सेलिब्रेशन करतात. मुलीच्या संपूर्ण कुटुंबियांचा छोटा सत्कार केला जातो. हॉस्पिटल देखील सजवण्यात येतं. कर्मचारी आणि मुलीचं कुटुंबीय मिळून केक कापण्यात येतो.
आईमुळे डॉक्टर झालो...
मला कधीच डॉक्टर व्हायचं नव्हतं. मी लहानपणापासून कुस्ती खेळायचो. त्यामुळे मला कुस्तीतच माझं करिअर करायचं होतं. रोज कुस्तीचा सराव करत होते. त्यावेळी आमची परिस्थिती नीट नव्हती. त्यामुळे कामासाठी आईने मला मार्केट यार्डमध्ये पाठवलं. तिथे मी गोण्या उचलायचं काम करायचो. कुस्ती खेळलास तर काय मिळणार, असा प्रश्न आई रोज विचारत होती. मात्र माझ्याकडे याचं उत्तर नव्हतं. अभ्यासात हुशार असल्याने आईने मला डॉक्टर होण्याचा सल्ला दिला आणि मी त्या दिशेने अभ्यासाला सुरुवात केली. आज तिच्यामुळे मी डॉक्टर झालो आणि हे मुलींच्या जन्मासाठी जनआंदोलन करु शकत आहे, असं गणेश राख सांगतात.