Pune Lal Mahal Lawani: अभिनेत्री वैष्णवी पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांनी पुण्याच्या लाल महालात लावणीवर रिल शुट केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत लाल महालासमोर आंदोलन केलं. लाल महालातील रिलमुळे पुण्यात नव्या वादाला तोंड फुटलंय. शुटींग करणाऱ्यांविरोधात हे आंदोलन करण्यात आलं आहे.


पुण्यातील ही ऐतिहासिक भूमी आहे. जिथे जिजाऊंनी शिवरांयांना स्वराज्याचे धडे दिले. त्याच लाल महालात अशा प्रकारचं कृत्य करणं लज्जास्पद आहे. या पवित्र भूमीवर ज्यांनी लावणी केली त्यांचा धिक्कार करायला हवा. या चौंघांना अटक झाली पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घेतली आहे.


महिला दिनाला याच महालात आम्ही आदर्श पुरस्कार दिले. याच ठिकाणी पारंपरिक आणि ऐतिहासिक कार्यक्रम होतात. याआधी अशा प्रकारचं कृत्य कधीही घडलं नाही. त्यामुळे यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली आहे.


अखिल भारतीय मराठा संघाकडून शुद्धीकरण 
लावणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक संघटना एकत्र येत आक्षेप घेतला. संभाजी ब्रिगेड संघटनेने या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अभिनेत्री वैष्णवी पाटील, मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे असे गुन्हा दाखल झालेल्या कलाकारांचे नाव आहे. लाल महालातील हे कृत्य योग्य नाही, अशी भूमिका घेत अखिल भारतीय मराठा संघाकडून लाल महालाचं शुद्धीकरण करण्यात आले. 


सुरेखा पुणेकर काय म्हणाल्या? 
लावणीसाठी भरपूर व्यासपीठ दिले आहेत. वैष्णवीने ऐतिहासिक ठिकाणी लावणी करायला नको होती. पण यावरुन जे राजकारण सुरु आहे. लावणी महाराष्ट्राची शान आहे. त्यामुळे त्यावरुन राजकारण करु नका हे चुकीचं आहे, अशी भूमिका लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकारांनी घेतली आहे.


जितेंद्र आव्हाडचा ट्विट करत विरोध
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत विरोध दर्शवला."पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे, यापुढे होता कामा नाही, कोणी केले असेल तर ते चित्रीकरण वापरू नका", असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय.