Lal Mahal Lawani : पुण्याच्या लाल महालात लावणी सादर केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात  चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री वैष्णवी पाटील, मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. संभाजी ब्रिगेड संघटनेने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.त्यानुसार या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पुण्याच्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी या लावणीवर आक्षेप नोंदवला होता. त्यांनी आक्रमक भूमिका देखील घेतली. वैष्णवी पाटील आणि सहकार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत विरोध दर्शवला."पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे, यापुढे होता कामा नाही, कोणी केले असेल तर ते चित्रीकरण वापरू नका", असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय. 


 



लाल महालात महापालिकेचे सुरक्षा रक्षकही असतात. मात्र तरीही संबंधित कलाकार आणि तरुणांनी सुरक्षारक्षकाला हाताशी धरुन लाल महालात लावणीचं शुटिंग केल्याचा आरोप होतोय.कुलदीप बापट यांनी या संबंधित गाण्याचं शूटिंग केलंय तर डान्सर वैष्णवी पाटील यांनी लावणी केल्याचं समोर आलंय. इंस्टाग्रामवर रिल्स शेअर करण्यासाठी चक्क लाल महालमध्ये ही लावणी करण्यात आली.


काय आहे या व्हिडीओत?


सध्या सगळीकडे ट्रेडिंग असलेल्या चंद्रा गाण्यावर संबंधित तरुणी डान्स करताना दिसून येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा या गाण्यावर एक तरुणी पुण्यातील लाल महालातील मध्यवर्ती ठिकाणी थिरकताना दिसत आहे. संबंधित तरुणी लावणीवर बेभान होऊन अदाकारी करताना दिसत आहे. पुण्यातील ऐतिहासिक लाल महालमध्ये लावणीचा व्हिडीओ शुट केल्यामुळे याचा विरोध म्हणून अनेक संघटना आता आक्रमक झाल्या आहेत.



संभाजी ब्रिगेड संघटना आक्रमक
पुण्याच्या महापालिकेच्या आणि सुरक्षारक्षकांकडून उन्हाळ्याच्या सुट्टीत लाल महाल बंद ठेवण्यात आला होता.अनेक पर्यटक या ठिकाणी जिजाऊंच्या चरणी  नतमस्तक होण्यासाठी येतात. लाल महाल पर्यटकांसाठी आहे. तो रिल्स बनवण्यासाठी नाही आणि लावणीसाठीतर अजिबात नाहीं असं मत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे.